Belgaum Fraud : दोन हजारला ड्रेस सात, फसवणुकीने घात!

वडगावच्या महिलेला सव्वा लाखांचा गंडा
Fraud
FraudPudhari News
Published on: 
Updated on: 

बेळगाव : दोन हजार रूपयांमध्ये सात ड्रेस मिळवा, अशा आशयाची जाहिरात इन्स्टाग्रामवर करून त्याद्वारे वडगावच्या महिलेचा सव्वा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी बेळगावातील आदर्शनगर वडगाव येथील रूपाली नामक महिलेने शहर सीईएन पोलिसांत फिर्याद दिली आहे.

ड्रेससाठी ऑर्डरही दिली. परंतु, ड्रेस तर आले नाहीतच. उलट भामट्याने ड्रेस पाठवण्यासाठी बँकेचा तपशील विचारत सदर महिलेला तब्बल १ लाख २० हजार रूपयांचा गंडा घातला. शुक्रवारी २० रोजी या प्रकरणाची सीईएन पोलिसांत नोंद झाली आहे. रुपाली यांनी तक्रारीत म्हटले आहे की, २७ ऑक्टोबररोजी त्या मोबाईल पाहत असताना त्यावर एक जाहिरात आली. टीना कलेक्शन नावाने प्रसारित झालेल्या या जाहिरातीत दोन हजार रूपयांना सात ड्रेस खरेदी करा, असे नमूद करण्यात आले होते.

जाहिरातीला भुलून रुपाली यांनी आपल्या युनियन बँकेच्या खात्यावरून यूपीआयद्वारे २ हजार रूपये पाठवून दिले. मात्र रक्कम पाठवूनही ड्रेस न आल्याने त्यांनी या जाहिरातीत असलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. यावेळी समोरच्या अनोळखी व्यक्तीने त्यांच्याशी संवाद साधला. पार्सल डिलीव्हरी व बिलिंग प्रक्रीया पार पाडण्यासाठी तपशील विचारण्यास सुरवात केली. त्यानुसार संबंधित भामट्याने सांगितल्यानुसार महिलेने २ हजारच्या ड्रेससाठी टप्प्याटप्प्याने तब्बल १ लाख २० हजार रूपये पाठवून दिले. २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर दरम्यान हा प्रकार घडल्यानंतर सदर महिलेने १९२० वर फोन करून सांगितले. त्यानंतर हे प्रकरण शहर सीईएनकडे वर्ग करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी पुढील तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.