

बेळगाव : विधिमंडळाचे १० दिवसांचे हिवाळी अधिवेशन बेळगावमधील सुवर्णसौधमध्ये ७ डिसेंबरपासून आयोजित करण्याचा प्राथमिक निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे समजते. मात्र, अधिवेशनाची नेमकी तारीख, कालावधी आणि अधिकृत वेळापत्रकाबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यानंतरच सर्व स्पष्ट होईल.
गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सर्व विभागांची बैठक घेऊन अधिवेशनाची तयारी करण्याची सूचना केली होती. आता सरकारने डिसेंबर महिन्यात अधिवेशन घेण्याचे निश्चित केल्याचे समजते. या अधिवेशनात उत्तर कर्नाटकातील विविध जिल्ह्यांसमोरील सिंचन, कृषी, रोजगार, उद्योग, शिक्षण, आरोग्य, रस्ते संपर्क आणि पिण्याचे पाणी, हे मुद्दे प्रामुख्याने उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधींना या भागातील जनतेच्या प्रदीर्घ प्रलंबित मागण्यांकडे आणि विकासाशी संबंधित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्याची संधी मिळेल.
अधिवेशनाच्या पूर्वतयारीनिमित्त बेळगावात प्रशासकीय व्यवस्था, सुरक्षा उपाययोजना, वाहतूक व्यवस्थापन, निवास व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधांशी संबंधित हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. अधिवेशनादरम्यान मंत्री, आमदार, सरकारी अधिकारी, विविध विभागांचे कर्मचारी आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी अशा शेकडो मान्यवरांचे व कर्मचाऱ्यांचे बेळगावात आगमन होईल. यामुळे शहरातील हॉटेल्स आणि निवास व्यवस्था, वाहतूक सेवा आणि इतर व्यावसायिक उपक्रमांना चालना मिळण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या नेमक्या तारखा, कामकाजाचे वेळापत्रक आणि इतर तपशीलांबाबत सरकारकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.