Belgaum Crime : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून

हनुमाननगर येथील घटना : माहेरी गेलेली परत आली अन्‌ प्राण गमावला
Belgaum Crime
बेळगाव : संशयित विठ्ठल हेगडेला अटक करुन नेताना पोलिस.
Published on: 
Updated on: 

बेळगाव : चारित्र्याचा संशय घेऊन सतत भांडण काढणाऱ्या पतीने दारुच्या नशेत पत्नीचा धारदार शस्त्राने खून केला. सर्वत्र दसरा सोने-लुटीची धामधूम सुरु असताना मंगळवारी (दि. २०) रात्री नऊच्या सुमारास हा खुनाचा थरार घडला. अश्विनी विठ्ठल हेगडे (वय २६, मूळ रा. मरडीनागलापूर, ता. बैलहोंगल, सध्या रा. मुरलीधर कॉलनी, हनुमाननगर) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती विठ्ठल रुरद्राप्पा हेगडे (वय ३१) याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत एपीएमसी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विठ्ठल व अश्विनीचा विवाह बारा वर्षांपूर्वी झाला असून त्यांना दोन मुले आहेत. मोलमजुरी करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून हे कुटुंब बैलहोंगल तालुक्यातून बेळगावला आले आहे. हनुमाननगर परिसरात ते राहत होते. अश्विनी व विठ्ठल दोघेही कामाला जात होते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून विठ्ठल हा अश्विनीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून दोघांमध्ये सातत्याने वाद होत असे.

अश्विनीचे माहेर धारवाड जिल्ह्यातील चिक्कमल्लीगवाड आहे. परंतु, तिचे पालकही गेल्या अनेक वर्षांपासून बेळगावातच वास्तव्यास आहेत. तिचे कुटुंब सध्या राजीव गांधीनगर येथे राहते. दसरा असल्याने अश्विनी आपल्या आईकडे माहेरी गेली होती. परंतु, तिच्या हनुमाननगरमधील घरी सासरे आजारी असल्याने व त्यांना स्वतःला उठून जेवता येत नसल्याने जेवण वाढण्यासाठी ती घरी आली होती. नेमक्या याचवेळी पती विठ्ठल हा मद्यप्राशन करुन आला होता. त्याने चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीशी भांडण उकरुन काढले. यामुळे दोघांमध्ये वाद सुरु झाला. नशेच्या अंमलात असलेल्या विठ्ठलने धारदार शस्त्राने अश्विनीवर वार केल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यातच तिचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक, एपीएमसीचे पोलिस निरीक्षक उस्मान आवटी, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मृत अश्विनीची आई कल्लव्वा सुभाष कुरीगार (वय ४७, मूळ रा. चिक्कमल्लीगवाड, जि. धारवाड, सध्या रा. राजीव गांधीनगर बेळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एपीएमसी पोलिसांत नोंद झाली आहे. नशेत असलेल्या पतीला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला. न्यायालयासमोर उभे केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news