

बेळगाव : शहरात मुख्य भूमिगत जलवाहिनी जोडणीचे काम बुधवारपासून हाती घेण्यात आले आहे. हे काम शनिवार, 4 एप्रिलपर्यंत चालणार आहे. त्यामुळे शहरात चार दिवस पाणीपुरवठ्यात व्यत्यय निर्माण होणार असल्याची माहिती एलॲण्डटी कंपनीने दिली आहे.
शहरात सध्या आठ दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. चार दिवस पाणीपुरवठा ठप्प होणार असल्याने बारा दिवसांनी पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा व एलॲण्डटी कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन कर्नाटक पाणीपुरवठा मंडळाने केले आहे.
सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळेनासे झाले आहे. गल्लीतील विहिरी व कुपनलिकांनी तळ गाठला आहेत. त्यामुळे पाण्याची टंचाई आहे. त्यात चार दिवस पाणीपुरवठा ठप्प होणार असल्याने अडचणींत वाढ होणार आहे.