

बेळगाव : यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्यावर संकटाचे सावट निर्माण झाले आहे. परतीच्या पावसानेही पाठ फिरवल्याने उन्हाळ्यापर्यंत पुरेल इतका पाणीसाठा उपलब्ध नसल्याची माहिती एलअँडटी कंपनीकडून देण्यात येत आहे. उपलब्ध पाणीसाठा पुढील आठ महिने जपून वापरण्याची वेळ आल्याने आतापासूनच पाणीपुरवठ्यात कपात केली जात आहे. भविष्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता लोकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरात सध्या मार्कंडेय नदीच्या पात्रातून पाणी उपसा करुन पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, अनेक भागांत आठ दिवसांतून एकदा होणारा पाणीपुरवठाही पुरेशा प्रमाणात होत नसल्याने लोकांना दैनंदिन गरजांसाठी कूपनलिका आणि विहिरींच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. शहरात एलअँडटी कंपनीकडून सध्या ४३ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. दुसरीकडे व्यावसायिकांवरही आतापासूनच टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.
चोवीस तास पाण्याचे काय?
शहरात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची तयारी एलॲंडटी कंपनीकडून सुरु आहे. मात्र, पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने पाणीपुरवठा करताना मर्यादा येत आहेत. शहरातील एकूण ५८ प्रभागांपैकी केवळ १० प्रभागांत २४ तास पाणीपुरवठा सुरु आहे. उर्वरित ४८ प्रभागांत ही व्यवस्था कार्यान्वित करण्याचे मोठे आव्हान कंपनीसमोर आहे.
पाणी जपून वापरावे लागणार
शहराला राकसकोप आणि हिडकल जलाशयांतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने या जलाशयांमध्ये अपेक्षित पाणीसाठा जमा झालेला नाही. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा वापर जपून करावा लागत आहे. पाण्याची मागणी आणि उपलब्ध साठा यांचा ताळमेळ साधताना महापालिका आणि पाणीपुरवठा यंत्रणेची कसरत सुरु आहे. तिलारीचे पाणी शहराला उपलब्ध झाल्यास भविष्यातील पाणीटंचाईवर काही प्रमाणात मात करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, या पर्यायी व्यवस्थेची अंमलबजावणी होईपर्यंत उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तर उन्हाळ्यात गंभीर समस्या
शहरातील वाढती पाण्याची गरज, मर्यादित जलसाठा आणि २४ तास पाणीपुरवठ्याचे अपूर्ण उद्दिष्ट पाहता आगामी काळात पाणीपुरवठ्याचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. वेळेत पर्यायी जलस्रोत उपलब्ध झाले नाहीत तर उन्हाळ्यात बेळगावकरांना पाणीटंचाईच्या गंभीर समस्येला सामोरे जावे लागू शकते.