Belgaum water park accident: पाण्यातील उडी ठरली जीवघेणी

कुट्टलवाडी वॉटर पार्कमध्ये जखमी युवकाचा मृत्यू
Belgaum water park accident: पाण्यातील उडी ठरली जीवघेणी
Published on
Updated on

बेळगाव : उन्हाळी सुटीचा आनंद लुटण्यासाठी कुट्टलवाडीच्या फन पार्कला गेलेल्या युवकाचा जलतरण तलावात उडी घेताना डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे मृत्यू झाला आहे. अतुल केशव पावशे (वय ३८, रा. हिंडलगा) असे मृताचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अतुल ९ मेरोजी कुटुंबीयांसह कुट्टलवाडीच्या पार्कला गेला होता. पार्कमध्ये लहानांसह मोठ्यांसाठी जलक्रीडा तलाव आहे. शिवाय तलावात उतरण्यासाठी पायऱ्यांसह दोन घसरगुंड्याही आहेत. जलतरण तलावाची खोली जास्त नाही. तलावात उभे राहूनही जलक्रीडांचा आनंद लुटता येतो. तथापि, अतुलने तलावात सूर मारला. त्‍यामध्‍ये डोके जमिनीला आदळून मानेला जबर मार लागला.

तो जखमी झाल्याने त्याला तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. चार दिवस त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचाराचा उपयोग न होता त्याचा मृत्यू झाला. घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.

सुरक्षिततेचे उपाय काय?

जलक्रीडा करण्यासाठी कुट्टलवाडीच्या पार्कमध्ये दोन तलाव आहेत. एक फक्त लहान मुलांसाठी आहे. तर दुसरा तलाव लहान आणि मोठे अशा दोन्ही वयोगटांसाठी आहे. मात्र तलावांच्या शेजारी सूचना फलक नाही. तसेच सुरक्षा रक्षक म्हणून काही युवकांची नियुक्ती केली असली तरी त्यांच्याकडून गर्दीवर नियंत्रण राखले जात नाही. एका तलावासाठी दोनच सुरक्षा रक्षक आहेत. मात्र तलावात एकाचवेळी वीसहून अधिक लोक असताना त्यांच्यावर नियंत्रण अ‍वघड बनते. याशिवाय घसरगुंडीवरून तलावात सूर मारू नये, अशा प्रकारची सूचनाही दिली जात नाही. त्यामुळे अपघाताचा धोका आहे.

उत्साहाला आवर घालण्याची गरज

मौजमजा करण्यासाठी पार्कला गेलेल्या पर्यटकांनी उत्साहाला आवर घालत स्वतःची काळजी घेणे गरजेचे आहे. धोकादायक पद्धतीने अतिउंचीवरून उड्या न मारणे, पाणी खोल असेल तर सुरक्षा ट्यूबचा वापर करणे टाळणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news