

अंकली : कागवाड तालुक्यातील उगार खुर्द येथे गुरुवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास तीव्र उष्णतेमुळे एका भाजी विक्रेत्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वर्धमान मगदूम (रा. उगार बुद्रुक) असे त्याचे नाव आहे.
उगार खुर्द येथील भाजी मार्केटमध्ये व्यापार करत असताना अचानक चक्कर येऊन खाली कोसळले. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात हलविले. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. या घटनेनंतर भाजी विक्रेते व नागरिकांनी पालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
व्यापाऱ्यांकडून नियमितपणे कर वसूल केला जात असतानाही अनेक वर्षांपासून बाजारपेठेत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचा आरोप त्यांनी केला. बाजार परिसरात स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्यासह महिलांसाठी पुरेशा शौचालयांचीही व्यवस्था नाही. उन्हाळ्यात सावलीची सोय नसल्याने व्यापारी व ग्राहकांना तीव्र उकाड्याचा सामना करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.