

बेळगाव ः वाल्मिकी भवन उभारण्यावरून झालेल्या वादातून दोन समुदायांमध्ये तुफान हाणामारी झाली. बैलहोंगल तालुक्यातील देशनूर येथे गुरूवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी एका गटातील पाचजणांना तर दुसऱ्या गटातील दोघांना बैलहोंगल पोलिसांनी ताब्यात घेतले.
आमच्या भागात वाल्मिकी भवन का, असे म्हणत ज्या व्यक्तीने विरोध केला त्याच्या घरावर तुफान दगडफेक केली. हल्लेखोरांच्या तावडीतून या घरमालकाला उपनिरीक्षकाने सोडवत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.
वाल्मिकी भवन बांधण्यासाठी त्या समुदायाकडून जागेचा शोध सुरू होता. त्यांनी अनुसूचित जातीची वसाहत असलेल्या ठिकाणी वाल्मिकी भवनसाठी जागा निश्चित केली. या जागेची पाहणी करण्यासाठी गुरूवारी दुपारी काही तरुण व वाल्मिकी समाज बांधव तेथे गेले. यावेळी येथील रहिवाशी सदाशिव बजंत्री यांनी याला आक्षेप घेतला. ही हरिजन वसाहत असून येथे वाल्मिकी भवन का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यातून दोन्ही गटांमध्ये वाद वाढत गेला. यावेळी काही तरुणांनी बजंत्री यांना मारहाण करत त्याच्या घरावर प्रचंड दगडफेक केली. यामध्ये त्यांच्यासह अन्य काही महिला देखील जखमी झाल्या. घरात घुसून शिवीगाळ व मारहाण करणारा या गावातील व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला.
बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन दोन्ही गटाला शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही तरुण पोलिसांच्या समक्षच दगडफेक व शिवीगाळ करत होते. हल्लेखोरांनी बजंत्री यांना मारबडव करताना उपनिरीक्षकाने त्यांच्या तावडीतून सोडवून घेतले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रमुख के. रामराजन यांनीही घटनास्थळी पाहणी करून माहिती घेतली. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्या ठिकाणी घटना घडली त्या भागात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.