

कारवार : वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिला लोकप्रतिनीधींचे एकाच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याची घटना शनिवारी (दि. 1) कारवार जिल्ह्यात घडली. गीता बोवी (रा. इटगुळी, ता. शिर्सी) व सुमित्रा बंट (रा. भाविकेरी, ता. अंकोला) अशी त्यांची नावे आहेत.
गीता बोवी इटगुळी ग्राम पंचायतीच्या माजी अध्यक्षा होत्या. तर सुमित्रा बंट भाविकेरी ग्राम पंचायतीच्या सदस्या होत्या. दोघीही तळागाळातील लोककेंद्रित उपक्रमांमध्ये सक्रिय होत्या. समर्पित सार्वजनिक सेवेमुळे त्या आपापल्या भागात लोकप्रिय होत्या. मात्र, दोघींचेही एकाच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे स्थानिक राजकीय वर्तुळासह ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. स्थानिक आमदार भीमण्णा नाईक यांनी बोवी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त करुन त्या दिवशी मतदारसंघाती सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले. स्थानिक नेत्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वांनी सोशल मीडियावर शोक संदेशांचा वर्षाव केला.