

बेळगाव : जिल्ह्यातील रायबाग व सौंदत्ती तालुक्यातील दोन महिलांची सुमारे चार लाख रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची नोंद जिल्हा सीईएनमध्ये झाली आहे. एका महिलेला हॉटेल रिव्ह्यू देण्याच्या आमिषाने तर दुसऱ्या महिलेची एपीके फाईलद्वारे फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
रायबागमधील २३ वर्षीय महिला इन्स्टाग्रामवर रील्स् बघत असताना तिला पार्ट टाईम मार्केटिंग सर्व्हिसेसमध्ये गुंतवणूक करुन नफा मिळवा, अशा आशयाची एक जाहिरात आली. यावरून तुम्ही जर आम्ही सांगितलेल्या हॉटेल्सना चांगले स्टार दिलेत तर तुम्हाला अमूक इतका फायदा होईल, असे सांगत संबंधित महिलेच्या बँक खात्याचा तपशील घेतला. इतकेच नव्हे तर कागदपत्रे तयार करण्यासाठी तुमचे आधारकार्ड व पॅनकार्ड पाठवा म्हटल्यानंतर सदर महिलेने कागदपत्रेही पाठवली. भामट्यांनी बँकेचा तपशील व अन्य कागदपत्रे घेऊन सदर महिलेच्या बँक खात्यावरुन १ लाख ८७ हजार रुपयांची रक्कम हडपली. हा प्रकार ४ ते ७ सप्टेंबर या दरम्यान घडला आहे.
सौंदत्ती तालुक्यातील एका महिलेच्या खात्यावरुनही १ लाख ९७ हजार रुपयांची रक्कम काढून घेतल्याची नोंद जिल्हा सीईएनमध्ये झाली आहे. रायबाग तालुक्यातील बेटसूर येथील या महिलेला एपीके फाईल पाठवून त्याद्वारे ही रक्कम लाटल्याची नोंद आहे. त्यांनी एपीके फाईलवर क्लिक करताच त्यांच्या केव्हीजी बँक खात्यातील रक्कम भामट्यांनी काढून घेतली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.