

बेळगाव : लोकापूरहून सालळ्ळीकडे जाणाऱ्या बसमधून उतरत असताना एका महिलेच्या हँडबॅगमधील सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याप्रकरणी कटकोळ पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे. त्या दोघीही बेळगावातील गँगवाडीच्या आहेत. त्यांच्याकडून एकूण ४ लाख १६ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले असून, कटकोळ येथील गुन्ह्यासह मुरगोड पोलीस ठाण्यातील एका जुन्या चोरीच्या गुन्ह्यातील दागिन्यांचा त्यात समावेश आहे.
कटकोळचे पोलीस उपनिरीक्षक बसवराज कोन्नूरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उमा विशाल चौगुले (वय ४०) आणि आरती शिवा चौगुले (वय २८, दोघीही रा. शिवबसव नगर, गॅगवाडी, बेळगाव) यांना अटक केली.
गेल्या १४ मेरोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास मंजुळा नरगुंद (वय ३३, रा. बिडगी, ता. रामदुर्ग) या लोकापूरहून सालळ्ळीकडे जाणाऱ्या बसमधून उतरत होत्या. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हँडबॅगमधून ३० ग्रॅम वजनाचे सुमारे ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तसेच ८० ग्रॅम वजनाचे १६ हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले होते. कटकोळ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.
पोलीस प्रमुख के. रामराजन, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख आर. बी. बसरगी, रामदुर्ग उपविभागाचे डीएसपी चिदंबर मडवाळ आणि रामदुर्गचे पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. तपासादरम्यान कटकोळ पोलीस ठाण्यातील दाखल झालेल्या गुन्ह्यामधील ३० ग्रॅम सोन्याची साखळी व तावीज, ८० ग्रॅम चांदीचे पैंजण असा एकूण ३ लाख १६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मुरगोड पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यामधील चोरीच्या प्रकरणाशी संबंधित लॉकेटसह २५ ग्रॅम सोन्याची साखळीही संशयितांकडून हस्तगत करण्यात आली आहे.
गुन्हे शाखेचे कर्मचारी बी. व्ही. हुलकुंद, एस. एस. वज्रमट्टी, एम. सी. मन्निकेरी तसेच तपास पथकातील आर. बी. गोकाक, बी. एस. चुंचनूर, एम. एम. द्यामन्नगौडर, एस. जी. गंगाई आणि तांत्रिक पथकातील विनोद ए. ठक्कनवर व सचिन पाटील यांनी कारवाईत भाग घेतला.