

बेळगाव : मालवाहतूक ट्रक व बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात बसचालकाचा जागीच मृत्यू झाला तर बसमधील आणखी एका तरुण प्रवाशाचा बेळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेमध्ये मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या बस बसमधून दहा प्रवासी प्रवास करत होते. हा अपघात मंगळवारी (दि.२२) बेळगाव-वेंगुर्ला या राज्य मार्गावर बेळगाव तालुक्याच्या हद्दीजवळील सुपे (ता.चंदगड) येथे सायंकाळी चार वाजता झाला.
चंदगड पोलिस ठाण्यात याबाबतची घटना नोंद झाली आहे. याबाबत रेखा बाळकृष्ण सुतार (वय ४५, फुलबाग गल्ली, बेळगाव ) यांनी चंदगड पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. यावरून ट्रक चालकावर निष्काळजीपणाने अपघात घडवून आणण्याबद्दल गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर ट्रक चालकाचे अद्याप नाव तसेच जखमी रुग्णांची काही नावे अद्याप समजू शकली नाहीत.
याबाबत अधिक माहिती अशी की, चंदगड डेपोची पार्ले, मोटनवाडी, पाटणे फाटा मार्गे बेळगाव ही बस रोज धावते. या बसला हा अपघात झाला आहे. ही बस दहा प्रवाशांना घेऊन बेळगावला येत होती. ही बस ही मंगळवारी चार वाजता बेळगाव-वेंगुर्ला राज्यमार्गावर सुपे येथील वळणावर आली असता बेळगावहून कोकणात जाणाऱ्या १४ चाकी मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटून बसला धडक दिली. या घटनेमध्ये बस चालक लक्ष्मण पांडुरंग हळदणकर ( रा.चंदगड) हे जागीच ठार झाले, तर बसचे वाहक सुरेश यल्लाप्पा मरणहोळकर ( वय ४२, रा. घुलेवाडी, ता. चंदगड ) हे जखमी झाले आहेत. बस वाहकावर गडहिंग्लज येथे उपचार सुरू आहेत. सदर बसमधील आणखी एक प्रवासी बेळगाव येथे खाजगी दवाखान्यात उपचार सुरू असताना मृत झाल्याची माहिती मिळत आहे, मात्र रात्री उशिरा त्यांचे नाव समजू शकले समजू शकले नाही. बसमधील १० प्रवाशांपैकी काहीजण बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत तर काहीजण बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार घेत आहेत.
बेळगाव - वेंगुर्ला राज्यमार्गावर कुद्रेमाणी फाटा जवळ सुपे येथे धोकादायक वळण आहे. याच वळणावर हा अपघात झाला आहे. अपघातादरम्यान पावसाच्या हलक्याशा सरीही कोसळल्या होत्या. मालवाहू ट्रक हा १४ चाकी असल्याने येथील वळणावर त्याचे नियंत्रण सुटले आणि त्या ट्रक चालकाने थेट एसटीला धडक बसल्याची माहिती मिळाली. अनेक वर्षापासून सदर वळण हटवावे, अशी मागणी होत होती. मात्र त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने अनेकवेळा कानाडोळा केला.