

बेळगाव : मालमत्तेच्या वादातून दहाजणांच्या टोळीने सशस्त्र हल्ला करून दोन सख्ख्या भावांचा निर्घृण खून केल्याची घटना यरगट्टी तालुक्यातील नुग्यानट्टी गावात बुधवारी (दि. १५) रात्री घडली. या हल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले असून, या घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत.
लगमाप्पा फकीराप्पा रामण्णावर (वय ३२) व बस्साप्पा फकीराप्पा रामण्णावर (वय ३८, दोघेही रा. नुग्यानट्टी, ता. यरगट्टी) अशी मृतांची नावे आहेत. फकीराप्पा एन. रामण्णावर (वय ६२) आणि बाळेश बी. रामण्णावर (वय १२) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, जमिनीच्या व मालमत्तेच्या जुन्या वादातून रात्रीच्या सुमारास सुमारे दहाजणांच्या टोळक्याने धारदार शस्त्रे व अन्य हत्यारे घेऊन रामण्णावर कुटुंबावर अचानक हल्ला चढविला. या हल्ल्यात दोन्ही भावांवर सपासप वार करण्यात आले. त्यात लगमाप्पा व बस्साप्पा यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना वाचविण्यासाठी धावून आलेल्या कुटुंबीयांवरही हल्ला करण्यात आला. त्यामुळे, फकीराप्पा आणि अल्पवयीन बाळेश गंभीररीत्या जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच मुरगोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुहेरी खुनामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. या हल्ल्यात सहभागी दहाजण फरारी असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.