

बेळगाव : शहरातील कचरा विल्हेवाटीसाठी तीन जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. भाजप सरकारने तुरमुरी कचरा डेपोसाठी 2029 पर्यंत करार केला असला, तरी दोन महिन्यांत तेथील 70 टक्के भार कमी करण्यात येईल. आमच्या सरकारच्या हस्तक्षेपामुळे तुरमुरीच्या लोकांना होणारा त्रास कमी होईल, अशी माहिती महिला व बालविकासमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली.
मंत्री हेब्बाळकर सोमवारी काँग्रेस भवनात पत्रकार परिषदेत म्हणाल्या, शहरातील कचऱ्याचा भार तुरमुरीचे लोक उचलत आहेत. त्यावेळच्या सरकारने आणि महापालिकेच्या निर्णयामुळे 2029 पर्यंतचा करार करण्यात आला आहे; पण तेथील लोकांना होणारा त्रास दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आता या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी बेळगाव दक्षिण, बेळगाव उत्तर आणि यमनकर्डीजवळ अशा तीन ठिकाणी जागा निश्चिती करण्यात आली आहे. दोन महिन्यांत प्रत्यक्ष विल्हेवाटीला सुरुवात होणार असून, तुरमुरी येथील 70 टक्के भार कमी होईल. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी तशी ग्वाही दिली आहे.
तुरमुरी कचरा डेपो सुरू करण्यासाठी सरकारने आणि जिल्हा प्रशासनाने अनेक आश्वासने दिली होती. दरवर्षी लोकांची आरोग्य तपासणी, पिण्याच्या पाण्याची तपासणी, कुत्र्यांचे लसीकरण, शाळा-अंगणवाडींचा विकास करण्यात येईल; पण आजपर्यंत एक रुपयाही खर्च केलेला नाही. मागील सरकारने जबाबदारी टाळली असली, तरी आम्हाला ती जबाबदारी टाळता येत नाही. त्यामुळेच आम्ही हस्तक्षेप करून तीन ठिकाणी जागा निश्चिती केली आहे. त्यामुळे तेथील 70 टक्के भार कमी होणार आहे, असेही मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितले.