

बेळगाव : नाल्याशेजारी ट्रॅक्टरमधून बेकायदा कचरा टाकणार्या चालकावर महापालिकेने शनिवारी (दि. 21) दंडात्मक कारवाई केली. हरिकाका कंपाऊंड ते लेंडी नाला याठिकाणी ही कारवाई करण्यात आली.
राष्ट्रीय महामार्गाशेजारी अज्ञातांकडून कचर्याचे ढीग टाकले जात आहेत. मृत जनावरे, सडलेले खाद्यपदार्थ तसेच टाकाऊ पदार्थ रस्त्याशेजारी टाकण्यात येत आहेत. शनिवारी कचरा टाकणार्या एका ट्रॅक्टरचालकाला अडवून त्याच्यावर महपालिकेच्या अधिकार्यांनी कारवाई केली आहे.
राष्ट्रीय महामार्गाशेजारी टाकण्यात येत असलेल्या कचर्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे ये-जा करणार्या लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. शनिवारी महापालिकेचे नगरसेवक, तसेच अधिकारी या परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांना कचरा टाकण्यासाठी आलेला एक ट्रॅक्टर दिसला. नारायण सावंत यांनी ट्रॅक्टरचालकाला जाब विचारला. त्यावेळी त्याने मी पहिल्यांदाच येथे कचरा टाकण्यासाठी आल्याचे त्याने सांगितले.
परंतु, या परिसरात मेलेली जनावरे, मांस तसेच इतर कचरा असल्याचे महापालिका अधिकार्यांच्या लक्षात आले. तत्काळ आरोग्य निरीक्षकांना फोन करुन घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. तसेच टाकलेला सर्व कचरा उचलण्याची सूचना करण्यात आली. दंडात्मक कारवाई करण्यात आली.