

बेळगाव : दुकानात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका भुरट्या चोराला स्थानिकांनी रंगेहाथ पकडून मार्केट पोलिसांच्या ताब्यात दिले. टेंगिनकेरा गल्लीत बुधवारी (दि. २७) सायंकाळी ही घटना घडली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, टेंगिनकेरा गल्लीतील मुकेश ट्रेडिंग या दुकानात एक युवक शिरला. हालचाल संशयास्पद वाटल्याने स्थानिकांनी त्याच्यावर लक्ष ठेवले. दुकानातील रक्कम लांबविण्याच्या प्रयत्नात असताना त्याला पकडून तत्काळ मार्केट पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्याला ताब्यात घेतले. चौकशी केली असता हा युवक यापूर्वीही परिसरातील अनेक चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असल्याचे उघडकीस आले.
टेंगिनकेरा गल्ली, कामत गल्ली तसेच जुन्या पी. बी. रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढल्या होत्या. संबंधित युवक विविध दुकानांमध्ये चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वी कामत गल्लीतील एका दवाखान्यातून सुमारे ३५ हजार रुपयांची रक्कम चोरल्याची घटना घडली होती. तसेच जुन्या पी. बी. रोड परिसरातील एका मंदिरातही चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.