

खानापूर : नागुर्डावाडा (ता. खानापूर) येथील प्रसिद्ध नागेश महारुद्र मंदिरात चोरीची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम लंपास केली असून सीसीटीव्ही यंत्रणेतील मेमरी स्टोरेज डिव्हाइस आणि एलईडी स्क्रीनही चोरुन नेल्याचे आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच मंदिर समितीच्या सदस्यांनी खानापूर पोलिस ठाण्यात धाव घेतली. दानपेटी फोडल्याचे तसेच सीसीटीव्ही यंत्रणेतील महत्त्वाचे उपकरण चोरीस गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक निरंजनस्वामी व सुरेश यळगार यांनी मंदिराला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. पोलिसांनी प्राथमिक नोंदी घेत तपास सुरु केला असून चोरीचा छडा लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन मंदिर समितीच्या सदस्यांना दिले.
चोरीच्या घटनेमुळे भाविकांमध्येही चिंता व्यक्त होत असून मंदिराच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. यावेळी मंदिर समितीच्या वतीने अभिजित सरदेसाई, रवळू वडगावकर (गुरव-पूजारी), बाळू बिरजे, कृष्णा धुळ्याचे, नागेश पारवाडकर, नारायण देसूरकर, कृष्णा पारवाडकर, नामदेव पाटील, बाबू पाटील, नारायण महाजन, तानाजी चापगांवकर (गुरव-पूजारी), राघोबा चापगांवकर, धाकलू कुंभार यांच्यासह नागुर्डवाडा, नागुर्डा व विश्रांतवाडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.