

बेळगाव ः मराठी भाषा वाचविण्यासाठी आणि मराठी फलकांसाठी मध्यवर्ती समिती बैठकीत चर्चा झालेल्या डांबर मोर्चात संपूर्ण ताकदीनिशी उतरण्याचा निर्धार तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. तालुका म. ए. समितीची गुरुवारी (दि. 15) मराठा मंदिर सभागृहात बैठक झाली. माजी आमदार मनोहर किणेकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी हुतात्मा दिन आणि डांबर मोर्चाबाबत चर्चा करण्यात आली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने कंग्राळी खुर्द येथे शनिवारी (दि. 17) हुतात्मा अभिवादन कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. याशिवाय मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आगामी डांबर मोर्चामध्ये संपूर्ण ताकदीनिशी सहभागी होण्याचा ठराव गुरुवारी झालेल्या बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.
सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी 17 जानेवारी 1956 रोजी सीमाप्रश्नासंदर्भात झालेल्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात पाचजण हुतात्मा झाले. सीमाप्रश्नी सध्या न्यायालयीन लढाई सुरू असली तरी रस्त्यावरचा संघर्षही तितकाच महत्त्वाचा असून तो अधिक तीव्रतेने चालू ठेवण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन केले. तसेच 17 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता कंग्राळी खुर्द येथे आयोजित हुतात्मा अभिवादन कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी कार्याध्यक्ष आर. एम. चौगुले, जि. पं. माजी सदस्य रामचंद्र मोदगेकर, शिवाजी खांडेकर, दीपक पावशे, लक्ष्मण होनगेकर, धनंजय पाटील आदींनी मनोगत व्यक्त करत सीमा प्रश्नावरील लढ्याला अधिक व्यापक रूप देण्याची आवश्यकता व्यक्त केली. व्यासपीठावर सचिव एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, लक्ष्मण होनगेकर, रामचंद्र मोदगेकर, मोनाप्पा पाटील व विठ्ठल पाटील उपस्थित होते. या बैठकीत 17 जानेवारी रोजी कंग्राळी खुर्द येथे होणाऱ्या हुतात्मा अभिवादन कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहणे. मराठी सन्मान यात्रेला पाठिंबा देणे, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या आगामी डांबर मोर्चामध्ये संपूर्ण ताकदीनिशी सहभाग नोंदवणे, असे ठराव संमत करण्यात आले.