Belgaum News: चूक यंत्रणेची; शिक्षा प्रवाशांना

गुंजी बायपास मार्ग खुला न केल्याचा परिणाम : जुन्या रस्त्यावरुन जीवघेणा प्रवास, प्रवाशांत संताप
Belgaum News: चूक यंत्रणेची; शिक्षा प्रवाशांना
Published on
Updated on

खानापूर : बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील गुंजी बायपास मार्गाचे काम पूर्णत्वास येऊनही तांत्रिक कारणांमुळे तो अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. परिणामी सर्व वाहतूक जुन्या खड्डेमय रस्त्यावरुन वळवण्यात आली असून पावसाळ्यात या मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. चिखल, दलदल आणि रहदारी कोंडीमुळे प्रवासी, वाहनचालक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या जुन्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून अनेक वाहने त्यात अडकत आहेत. काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे खराब झाल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः शालेय बस, दुचाकीस्वार आणि पादचारी यांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. रोज होणाऱ्या कोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाढत असून अपघाताचा धोका देखील निर्माण झाला आहे.

गुंजी बायपासचे मुख्य काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणींचा दाखला देत प्रशासनाने मार्ग अद्याप सुरु केलेला नाही. त्यामुळे, लोकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पावसाळ्यात खराब झालेल्या जुन्या रस्त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना दैनंदिन कामकाजासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बायपास रस्ता तयार झाल्यामुळे जुन्या रस्त्याची डागडुजीही करण्यात आलेली नाही. त्यामुळे, खड्ड्यांनी भयानक रुप धारण केले आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, संबंधित कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष द्यावे. बायपास मार्ग त्वरित सुरुन जुन्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करावा. लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून आवश्यक उपाययोजना कराव्यात. येत्या सात दिवसांच्या आत बायपास मार्ग वाहतुकीसाठी खुला करुन अपूर्ण कामे पूर्ण करावीत. अन्यथा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते पंकज कुट्रे यांनी ग्रामस्थांच्यावतीने दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news