

बेळगाव : शहरालगतच्या पार्वतीनगर (कंग्राळी बुद्रुक) परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला लागला असून गेल्या दोन दिवसांत चार बालकांवर कुत्र्यांनी हल्ले केले आहेत. गुरुवारी (दि. २३) कुत्र्यांनी एका शाळकरी मुलाच्या गालाचा चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर पालकांमध्ये संतापाची लाट उसळली असून महापालिकेच्या निष्क्रियतेचा निषेध केला जात आहे.
गुरुवारी सकाळच्या सुमारास पार्वतीनगरमध्ये एक बालक घराबाहेर खेळत असताना मोकाट कुत्र्याने अचानक त्याच्यावर झडप घातली. कुत्र्याने मुलाच्या गालाचा चावा घेतला. गंभीर जखमी झालेल्या बालकाने आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील लोकांनी धाव घेत त्याला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. त्यानंतर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांत याच परिसरात मोकाट कुत्र्यांनी चार मुलांचा चावा घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे, पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी मुलांना घराबाहेर खेळण्यासाठी पाठविणे बंद केले आहे. शाळेत ये-जा करतानाही पालक स्वतः मुलांसोबत जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. वारंवार तक्रारी करुनही मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याचा आरोप लोकांनी केला आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.