

बेळगाव : मोकाट कुत्र्यांची समस्या सर्व शहरांमध्ये सामान्य झाली आहे. या कुत्र्यांकडून वाढते हल्ले होत असून अनेकांना जीव गमवावा लागत आहे. मोकाट कुत्र्यांच्या अशाच एका हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची घटना बागलकोटमध्ये उघडकीस आली आहे. अलैना लोकापूर (वय 10) असे त्या मुलीचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, नवनगरमधील रहिवासी असलेल्या अलैनावर काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यात ती गंभीररित्या जखमी झाली होती. तिचे नाक, डोळा आणि इतर ठिकाणी गंभीर दुखापती झाल्या होत्या. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अधिक उपचारासाठी हुबळीला पाठविण्यात आले होते. तिथे तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी (दि. 14) उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे बागलकोटमधील मोकाट कुत्र्यांची समस्या ऐरणीवर आली असून प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.