

बेळगाव : शिक्षण खात्याने दहावी आणि बारावी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन वषार्ंपासून तीन वार्षिक परीक्षा सुरू केल्या आहेत. मात्र विद्यार्थ्यांसाठी तीन परीक्षा आवश्यक आहेत का, असा प्रश्न विचारला जात असून, वर्षाला तीन परीक्षा प्रणालीमध्ये सुधारणा करून ‘परीक्षा-3’ रद्द करण्याबाबत चाचपणी सुरू करण्यात आली आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या अधिकार्यांनी कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाला अहवाल सादर करण्याचे तोंडी निर्देश दिले आहेत. तिसरी परीक्षा सहसा जून, जुलैमध्ये घेतली जाते. परीक्षा-1 मध्ये प्रत्येक गाव पातळीवर परीक्षा केंद्रे उपलब्ध असतात, विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचता येते. मात्र पुढच्या परीक्षांचे केंद्र फक्त शहरात असते. त्याशिवाय तिसर्या परीक्षेत उत्तीर्ण होणार्यांना उच्च शिक्षणासाठी दोन महिने उशीर होतो.
परिणामी अभ्यासक्रम पूर्ण करताना अनेक अडचणी येतात. तसेच बारावी निकाल आल्यानंतरही सीईटी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळत नाही.
सरकारने दहावी परीक्षा सीबीएसईच्या धर्तीवर लागू केली तर तिसरी परीक्षा अनावश्यक ठरेल. दहावीच्या निकालात पहिल्या वार्षिक परीक्षेतच सुमारे 75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतात. उर्वरित 25 टक्के विद्यार्थ्यांसाठी परीक्षा-2 पुरेशी आहे, असे म्हटले जात आहे.