Belgaum crime: पुष्पा स्टाईलने स्पिरिटची वाहतूक

१४ लाखांच्या स्पिरिटसह टँकर जप्त : म्हैसूरचा एकजण ताब्यात
Belgaum crime: पुष्पा स्टाईलने स्पिरिटची वाहतूक
Published on
Updated on

खानापूर : गोड्या तेलाची वाहतूक करत असल्याचे भासवून टँकर भरून स्पिरिटची वाहतूक करणाऱ्या म्हैसूरच्या चालकाला जिल्हा अबकारी भरारी पथकाने अटक केली आहे. सेम टू सेम पुष्पा स्टाईलचा वापर करून बेळगावमार्गे गोव्यात विक्री करण्याच्या उद्देशाने या स्पिरिटची वाहतूक केली जात होती. जांबोटी-कणकुंबी मार्गावरील जांबोटी गावाजवळ मंगळवारी (दि. १९) पहाटे ३.४५ वाजता ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सिद्धराजू पुट्टस्वामी शेट्टी, (४७, रा. नंजनगुड्ड, जि. म्हैसूर) याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, अबकारी विभागाचे निरीक्षक मंजुनाथ मळीगेरी रात्रीच्या गस्तीवर असताना जांबोटीजवळ एक टँकर (केए २२ बी ३७९३) गोव्याच्या दिशेने जाताना दिसला. टँकरला थांबवून चालकाकडे चौकशी केली असता त्याने टँकरमधून गोड्या तेलाची वाहतूक करत असल्याचे सांगितले. अधिक चौकशी केली असता त्याने गोड्या तेलाचे बिलही दाखविले. तथापि चालक देत असलेली उत्तरे संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी सखोल पाहणी केली असता स्पिरिटच्या बेकायदेशीर वाहतुकीचा प्रकार निदर्शनास आला.

टँकरच्या वरच्या बाजूला असलेल्या तिन्ही झाकणांना मोठा पाईप बसवून त्यामध्ये गोडे तेल साठविण्यात आले होते. तपासणीवेळी सापडल्यास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी केवळ या पाईपमध्ये गोडेतेल आणि उर्वरित संपूर्ण टँकर स्पिरिटने भरण्यात आला होता. या टँकरमध्ये १४,००० लिटर स्पिरिट आढळून आले असून त्याची १४ लाख रुपये होते. अधिकाऱ्यांनी स्पिरिटची शुद्धता तपासली असता ती ९८ टक्के आढळून आली आहे. त्यामुळे, गोव्यात मद्य तयार करण्यासाठीच त्याची वाहतूक होत असल्याचा संशय आहे.

स्पिरिट साखर कारखान्यात तयार होते. मद्यासह औषधे, कीटकनाशके आणि वैद्यकीय कारणांसाठी त्याचा वापर होतो. चालकाने दाखवलेल्या तेलाच्या बिलावर चेन्नई ते फोंडा वाहतूक होत असल्याचे नमूद आहे. त्यामुळे हे स्पिरिट नेमके कुठून कुठे नेले जात होते याचा तपास अधिकारी करत आहेत. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील कोणत्या साखर कारखान्याचा समावेश आहे का तसेच किती महिन्यांपासून ही शक्कल लढवून स्पिरिटची अवैध वाहतूक सुरू आहे याचाही तपास केला जात आहे.

अबकारी विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. मंजुनाथ, सहआयुक्त एफ. एच. चलवादी, उपायुक्त जगदीश एन. के. यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक रवी मुरगोड, निरीक्षक मंजुनाथ मळीगेरी, मल्लेशी उप्पार, उपनिरीक्षक नरूला खान, सुनील पाटील, मंजुनाथ बळगप्पनावर, वाय. बी. पाटील, बसवराज विवेकी, प्रकाश नंदी यांनी कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news