

खानापूर : खानापूर तालुक्यात रस्ते अपघातांचे सत्र सुरुच असून अवजड वाहनांच्या भरधाव वेगामुळे दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोमवारी आणि मंगळवारी अशा सलग दोन दिवसांत झालेल्या दोन अपघातांत एकाच कुटुंबातील दोघे याप्रमाणे चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घडलेल्या या घटनांनी दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शेवटच्या श्रावण सोमवारी लोकोळी क्रॉस ते तोपिनकट्टी मार्गावर झालेल्या भीषण अपघातात लक्केबैलमधील अशोक नांदुरकर आणि त्यांचा मुलगा पुंडलिक नांदुरकर यांचा मृत्यू झाला. कुटुंबातील दोन्ही कर्ते पुरुष अचानक गेल्याने नांदुरकर कुटुंबाचे भविष्य अंधकारमय झाले आहे. पुंडलिक यांच्या पश्चात आई आणि चार बहिणी असा परिवार आहे. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मंगळवारी रात्री खानापूर-रामनगर मार्गावरील माणिकवाडी क्रॉसजवळ भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात जटगेतील युवराज मळीक आणि त्यांच्या पत्नी मोहिनी यांचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या दोन वर्षांपूर्वी विवाहबद्ध झालेल्या या दांपत्याने सुखी संसाराची स्वप्ने रंगविली होती. मात्र, भरधाव ट्रक त्यांच्या आयुष्यात यमदूत बनून आला आणि क्षणात त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला.
दोन्ही अपघातांमध्ये अनेक साम्ये दिसून आली. दोन्ही घटनांमध्ये दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. समोरुन आलेल्या अवजड वाहनांच्या धडकेत हे अपघात झाले. विशेष म्हणजे अपघातानंतर संबंधित वाहनचालकांनी घटनास्थळावरुन पलायन केल्याचे समोर आले आहे. दोन्ही घटनांमध्ये एकाच कुटुंबातील सदस्यांचा बळी गेला.
तालुक्यातील अनेक प्रमुख रस्त्यांचा विकास झाल्याने वाहनांचा वेग वाढला आहे. मात्र, या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना होताना दिसत नाहीत. अवजड वाहने सुसाट धावत असल्याने पादचारी, सायकलस्वार आणि दुचाकीस्वारांचा जीव धोक्यात आला आहे. रस्त्यावरुन धावणारी ही वाहने ‘यमदूत’ ठरत असल्याचे चित्र आहे. अपघातप्रवण ठिकाणे निश्चित करुन तेथे वेगमर्यादा, सूचना फलक, आवश्यक प्रकाशव्यवस्था तसेच इतर सुरक्षात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे. पोलिस प्रशासनाने अवजड वाहनांच्या वेगावर प्रभावी नियंत्रण ठेवून वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी, अशी मागणी होत आहे.
चूक झाल्यानंतर माणुसकी दाखवा!
दोन्ही अपघातांमधील आणखी एक गंभीर बाब म्हणजे अपघातानंतर वाहनचालकांनी जखमींची मदत करण्याऐवजी घटनास्थळावरुन पलायन केल्याचे चित्र आहे. अपघातानंतरचा सुरुवातीचा काळ जखमी व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने वैद्यकीय मदत मिळाल्यास एखाद्याचा जीव वाचण्याची शक्यता असते. आपल्यामुळे अपघात झाला असून जमावाकडून मारहाण होण्याची भीती असल्याने चालक घटनास्थळावरुन पळ काढतात. मात्र, पलायन हा समस्येवरचा उपाय नाही. अपघात घडल्यानंतर परिस्थिती कितीही गंभीर असली तरी जखमींच्या मदतीला धावणे, पोलिसांना माहिती देणे आणि रुग्णवाहिका बोलावणे ही माणुसकीची जबाबदारी आहे. अपघातानंतरची ही काही मिनिटे एखाद्याचे आयुष्य वाचवू शकतात. त्यामुळे ‘पळून जाणे’ नव्हे, तर ‘मदतीला धावणे’ हीच खरी माणुसकी ठरावी.