

बेळगाव : पुरुष आणि महिलांचे संयुक्त अर्थात युनिसेक्स सलून व स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत चार महिलांची सुटका केली आहे. तसेच, स्पा चालवणाऱ्या दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. सुटका केलेल्यांपैकी एक महिला मुंबईची, दुसरी गुजरातची, तर दोघी कर्नाटकातील आहेत.
सीसीबी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : टिळकवाडी आरपीडी क्रॉस परिसरातील सराफ कॉलनीमध्ये डिव्हाईन युनिसेक्स सलून अँड स्पा सुरू होता. येथे मसाज व सलूनच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिस आयुक्तालयाला मिळाली होती. ‘सीसीबी’च्या (सिटी क्राईम ब्रँच) पथकाने जाऊन छापा टाकला असता, माहिती खरी निघाली. पोलिसांनी दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
स्पामध्ये चार महिला व ग्राहकही आढळून आले असून, त्या महिलांची सुटका केली, तर ग्राहकांना साक्षीदार बनविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिस आयुक्त प्रकाश निकम, कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी एन. व्ही. बरमणी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सीसीबी’चे निरीक्षक मंजुनाथ नायक व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.