

बेळगाव : जिने नऊ महिने उदरात वाढवले, लहानपणापासून जपले, संकटात आधार दिला, त्या आईलाच वृद्धापकाळात डोंगराळ भागात सोडून दिल्याची घटना सौदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी येथे उघडकीस आली आहे. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त होत आहे. याप्रकरणी माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुखांना संबंधित वृद्धेची तातडीने काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली आहे.
रामदुर्ग तालुक्यातील सालोळ्ळी गावातील कमलम्मा कट्टी या आजारी आहेत. मात्र त्यांचा सांभाळ करण्याऐवजी त्यांचा मुलगा संतोष याने सोमवारी रात्री सुमारे १० च्या सुमारास मुनवळ्ळी धरणाजवळील निर्जन डोंगराळ भागात त्यांना आणून सोडले. रात्रभर अंधारात आणि असहाय्य अवस्थेत पडून असलेल्या कमलम्मा सकाळी स्थानिक नागरिकांच्या नजरेला आल्या. यावेळी त्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून देत आपली व्यथा सांगितली. मुलानेच आपल्याला येथे आणून सोडल्याचे सांगून त्या रडत होत्या. त्यामुळे उपस्थितांचे डोळे पाणावले.
स्थानिकांनी तत्काळ त्या वृद्धेला जेवण देत आधार दिला. तसेच प्रशासन आणि पोलिसांना तातडीने याची माहिती दिली. दरम्यान, संतोष हा संकेश्वर डेपोमध्ये केएसआरटीसी कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. वृद्ध आणि आजारी आईला अशाप्रकारे एकाकी सोडून देण्याच्या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे.