SIR process: एसआयआर प्रक्रिया नेमकी काय?

राज्यातील ५.५७ कोटी मतदारांची होणार तपासणी : तिसऱ्या टप्प्यात आयोजन
SIR process
SIR process
Published on
Updated on

बेळगाव : केंद्रीय निवडणूक आयोगाने कर्नाटकसह १६ राज्ये, तीन केंद्रशासित प्रदेशमध्ये विशेष मतदारयादी सुधारणा (स्पेशल इन्टेन्सिव रिव्हिजन : एसआयआर) मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या टप्प्यात कर्नाटकात एसआयआर राबविण्यात येणार असून २० जूनपासून राज्यातील ५.५८ कोटी मतदारांची तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे एसआयआर म्हणजे काय? प्रक्रिया कशी राबविण्यात येणार आहे? प्रयोजन, महत्त्व काय आहे? असे प्रश्न आहेत.

एसआयआर म्हणजे काय?

भारतीय राजघटनेने 'एक व्यक्ती, एक मत' हा अधिकार प्रत्येक नागरिकाला दिला आहे. या तत्त्वाची अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने भारतीय निवडणूक आयोगाद्वारे ही प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये, बूथ स्तरावरील अधिकारी प्रत्येकाच्या घरी जाऊन मतदारांविषयी माहिती जमा करणार आहेत. मृत व्यक्ती, ज्यांची नावे दोन मतदारसंघात आहेत, जे स्थलांतरित झाले आहेत आणि जे अपात्र आहेत, त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येतात. त्याचबरोबर, यादीत समाविष्ट नसलेल्या आणि वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या पात्र मतदारांची नावांचा यादीत नव्याने समावेश केला जाणार आहे.

एसआयआर कशासाठी?

मतदार यादी निर्दोष करणे. बनावट, मृत आणि दुबार नावे काढून टाकणे. सर्व पात्र मतदारांचा यादीत करणे हे एसआयआरचे उद्दीष्ट आहे. यामुळे बनावट मतदान टाळले जाईल आणि निवडणुका अधिक निष्पक्ष होण्यास मदत होईल.

काय परिणाम होणार?

बनावट आणि अपात्र मतदारांची नावे मतदारयादीतून काढून टाकण्यात येणार असल्याने मताची किंमत वाढते. पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येतो. एक व्यक्ती, एक मत या संविधानाने दिलेल्या हक्कांची अंमलबजावणी करता येते. निवडणुकांवरील विश्वास वाढतो. मतदान केंद्रावरील गोंधळ कमी होण्यास मदत होते.

प्रक्रिया कशी चालणार ?

बूथ स्तरावरील अधिकारी (बीएलओ) घरी येतील आणि तुम्हाला एक फॉर्म देतील. तुम्हाला त्यावर नाव, पत्ता, वय, आधार इत्यादी तपशील भरून, त्यावर सही करून तो परत द्यावे लागेल.

सर्व प्रकारच्या पडताळणीनंतर नवीन मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

या कालावधीत तुमचे नाव मतदारयादीतून वगळल्यास तुम्ही नाव नोंदणीसाठी अर्ज करू शकता किंवा चुकीच्या तपशिलांबाबत आक्षेप नोंदवू शकता.

अधिकारी अर्जांची छाननी करून अंतिम निर्णय घेतील.

सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल.

तुम्ही काय करावे?

तुमचे नाव तपासा : तुमचे नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी Voters.eci.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. व्होटरहेल्पलाइन ॲप डाउनलोड करा आणि माहिती मिळवा. तुम्ही १९५० या क्रमांकावर EPIC<तुमचा EPIC क्रमांक> असा एसएमएस पाठवूनही तुमचे नाव तपासू शकता.

बीएलओ घरी आल्यानंतर : तुमच्या घरी आलेला बीएलओ तुम्हाला अर्ज देईल. तो अर्ज योग्यरित्या भरा, त्यावर सही करा आणि परत करा. आधार, रेशन कार्ड आणि वयाचा पुरावा देणारी कागदपत्रे तयार ठेवा.

ऑनलाइन अर्ज भरणे: ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. voters.eci.gov.in वर ऑनलाइन अर्ज भरता येतो.

तात्पुरती यादी मिळाल्यानंतर तात्पुरती मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामध्ये जर एखादे नाव वगळले असेल, तर फॉर्म-६ द्वारे दावा दाखल करा. जर अपात्र नावे नोंदवली गेली असतील, तर आक्षेप नोंदवा. शंका असल्यास, स्थानिक निवडणूक कार्यालयाशी किंवा हेल्पलाइन १९५० शी संपर्क साधा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news