

बेळगाव : बेकिनकेरेतील (ता. बेळगाव) महालक्ष्मी यात्रा अवघ्या 15 दिवसांवर येऊन ठेपली आहे. समस्त ग्रामस्थ यात्रेच्या तयारीला लागले असून घरोघरी विविध कामे सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर यात्रा उत्सव कमिटीतर्फे महालक्ष्मी यात्रेच्या मंडपाची मुहूर्तमेढ मंगळवारी (दि. 13) रोवण्यात आली.
तब्बल 66 वर्षांनंतर 3 ते 11 फेब्रुवारी या काळात महालक्ष्मी यात्रा होत असल्याने ग्रामस्थ सध्या घराची दुरुस्ती, रंगकाम, किरकोळ बांधकाम आदींसह स्वच्छता कामात व्यग्र असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर महालक्ष्मी यात्रेसाठी तयार करण्यात येत असलेल्या रथाचे काम पूर्ण झाले असून यात्रा जवळ येत आहे तसतसा उत्साह वाढत आहे. यात्रेसाठी 37 फूट उंच रथ तयार करण्यात आला असून त्याची सजावट व रंगरंगोटी पूर्ण झाली आहे. तसेच गावात 2 कोटी 60 लाख रुपयांच्या निधीतून पेव्हर्स व काँक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले असून शिल्लक काम अंतिम टप्प्यात आले आहे. या सर्व विकासकामांची पाहणी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नुकतीच केली असून यात्रा काळात येणाऱ्या भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
गोजगा, चलवेनहट्टी, कोवाड मार्गावर भाविकांसाठी पार्किंगची व्यवस्था केली जात आहे. यात्रा काळात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी सार्वजनिक विहिरी व कूपनलिकांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून सदर कामही अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान गावात टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन केले जात आहे. यात्रा अगदी जवळ येऊन ठेपल्याने ग्रामस्थ शेतीची महत्वाची कामे उरकून बाकी इतर कामात व्यस्त असून यात्रेसाठी लागणारे साहित्य खरेदी, आमंत्रण पत्रिका आदी कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. यात्रा कमिटीतर्फे रथ जोडणीबरोबर गदगेच्या जागेचे सपाटीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. सध्या मंडपाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. राजू खांडेकर व चाळू यळ्ळुरकर यांच्या हस्ते मुहूर्तमेढ रोवण्यात आली. यावेळी यात्रा कमिटी अध्यक्ष जयवंत सावंत, उपाध्यक्ष नारायण भडांगे, मल्लापा भातकांडे, अरुण गावडे, महादेव भडांगे, मोहन पवार, नारायण भोगण, सोमनाथ भडांगे, कृष्णा खादरवाडकर, नारायण बेळगावकर, मलाप्पा गावडे, गजानन मोरे, इराप्पा गावडे, ज्ञानेश्वर कोळी, नागेंद्र बिर्जे, भावकू धायगोंडे, प्रभाकर फडके यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.