

कागवाड : कागवाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाचपैकी दोन प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी उभारण्यात आलेल्या तीव्र आंदोलनाला मोठे यश मिळाले. कर्नाटक विद्युत खात्याने शेतकऱ्यांना रोज सात तास अखंड वीजपुरवठा देण्याची व्यवस्था तातडीने लागू करण्याची घोषणा केल्यानंतर माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांसमोर आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.
आंदोलनावेळी कागवाड तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी कायम ठेवत शासनाला ७ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत निर्णय न झाल्यास यापेक्षाही मोठे व्यापक जनआंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला. कागवाड शहरातील राणी चन्नम्मा सर्कल येथे सकाळी ११ पासून शेतकरी, युवक, विविध संघटनांचे पदाधिकारी व नागरिक एकत्र जमले होते. माजी मंत्री श्रीमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनाला वकील संघटनेने न्यायालयीन कामकाज बंद ठेवून पाठिंबा दर्शविला.
माजी आमदार महेश कुमठळ्ळी, राज्य भाजपचे मुख्य सचिव व माजी आमदार पी. राजू यांनीही आंदोलनात सहभागी होत दोन्ही प्रमुख मागण्यांसाठी जोरदार आवाज उठविला. आंदोलनात पाचपैकी दोन महत्त्वाच्या मागण्या शासनासमोर ठेवण्यात आल्या. पहिली मागणी शेतीपंपांना ७ तास अखंड वीजपुरवठा देण्याची आणि दुसरी मागणी कागवाड तालुका तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करण्याची उपस्थित केली.
माजी मंत्री श्रीमंत पाटील म्हणाले, निपाणी, चिकोडी, अथणी, रायबाग व कुडची तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत. पण कमी पाऊस पडूनही कागवाड तालुक्याला दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेले नाही. हा निर्णय अन्यायकारक असून कागवाड तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने दुय्यम वागणूक दिली आहे.
वीजपुरवठ्याबाबत सकारात्मक निर्णय मिळाल्यानंतर माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. पण दुष्काळग्रस्त घोषणेची लढाई अद्याप संपलेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासनाला ७ दिवसांची मुदत देण्यात आली असून या कालावधीत निर्णय न झाल्यास कागवाड तालुक्यातील सर्व गावांमधील शेतकरी रस्त्यावर उतरतील. यापेक्षाही मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
आंदोलन स्थगित करण्यापूर्वी तालुक्यातील महत्त्वाच्या ५ मागण्यांचे निवेदन पोलिस निरीक्षक राघवेंद्र खोत यांच्या उपस्थितीत तहसीलदार रवींद्र हादीमणी यांना देण्यात आले. युवानेते श्रीनिवास पाटील यांनी युवा शेतकरी आंदोलकांचे नेतृत्व केले. यावेळी भाजप मंडळ अध्यक्ष अरुण गणेशवाडी, वकील अभय अकिवाटे, शिवानंद पाटील, प्रकाश चौगुले, राकेश पाटील, सचिन कवटगे, दीपक कांबळे, विठ्ठल पवार, सुधाकर भगत, बाबासाहेब चौगुले, शिवाजी गायकवाड, नेताजी काटे, रामगौडा पाटील, सुभाष मोने यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.