Ramesh Katti : स्वतंत्र उ. कर्नाटकसाठी आंदोलन

माजी खासदार रमेश कत्ती : अधिवेशन म्हणजे नुसताच उत्सव
Ramesh Katti
Ramesh Katti
Published on: 
Updated on: 

चिकोडी : उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी बेळगावात सुवर्णसौध उभारण्यात आली. पण काही वर्षांपासून अधिवेशन म्हणजे फक्त उत्सव बनला आहे. अधिवेशनात उत्तर कर्नाटकच्या विकासासाठी चर्चा व्हावी, अन्यथा पुढील काळात स्वतंत्र उत्तर कर्नाटकच्या निर्मितीसाठी आंदोलन करू, असा इशारा माजी खासदार रमेश कत्ती यांनी दिला आहे.

चिकोडी तालुक्यातील बेळगली गावात पत्रकारांशी बोलताना कत्ती म्हणाले, प्रत्येकवर्षी बेळगावात अधिवेशन होत असले तरी उत्तर कर्नाटकातील समस्यांविषयी चर्चा केली जात नाही. पाणी योजना, उद्योग, रोजगारासह अनेक गंभीर समस्या आहेत. दहा वर्षांपूर्वी तत्कालीन सरकारने 'आमची कूच कृष्णेकडे' अशी हाक दिली होती. पण आजपर्यंत कृष्णेकडे कोणतेच सरकार गेलेले नाही. अलमट्टी धरणाची उंची ४२५ मीटर केल्यास १३ लाख शेतकऱ्यांना लाभ होईल. बंगळूरजवळ बिडदी येथे शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या जात आहेत. उत्तर कर्नाटकदेखील मोठ्या प्रमाणात जमिनी देतो, तसा प्रोजेक्ट इथे करावा.

राज्याच्या एकूण वीजेपैकी ८० टक्के उत्तर कर्नाटकमध्ये होते. पण उत्तर कर्नाटकला मिळते केवळ २० टक्के वीज. उर्वरित वीज बंगळूर भागासाठी वापरली जाते. मंड्यातील माय शुगर्स या सरकारी साखर कारखान्याला सरकारकडून पैसे दिले जातात. मग उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांना उसाला प्रोत्साहन निधी का मिळत नाही, असा सवालही कत्ती यांनी केला.

उत्तर कर्नाटकात केवळ ऊस हे एकमेव नगदी पीक आहे. सरकारच्या दरवर्षीच्या एकूण दीड लाख कोटी रुपये उत्पन्नापैकी ६० हजार कोटी रुपये उसापासून होणाऱ्या मोलॅसिस व दारूतून मिळतात. तरीही शेतकऱ्याला दर दिला जात नाही, अशी टीका कत्ती यांनी केली. उत्तर कर्नाटकावर नेहमी दुजाभाव केला जातो. येणाऱ्या अधिवेशनात न्याय द्यावा, अन्यथा पुढील काळात तरुणांना घेऊन उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्याच्या निर्मितीसाठी आंदोलन उभारू, असा इशारा त्यांनी दिला.

हुक्केरीवर राजकारणातून अन्याय

हुक्केरी तालुक्यात पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. तरीही हुक्केरी तालुक्यात दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले आहे. हे केवळ राजकारणातून करण्यात आले आहे. आमदार निखिल कत्ती आवाज उठवणार आहेत, असेही रमेश कत्ती म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.