

बेळगाव : घराचा उतारा देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामपंचायत सेक्रेटरीला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. महांतेश बळ्ळारी असे त्याचे नाव असून, लोकायुक्त पोलिसांनी मंगळवारी ही कारवाई केली.
लोकायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, चिलमुर (ता. रामदुर्ग) येथील व्यंकाप्पा यल्लाप्पा मरडी यांनी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार आपल्या पत्नीच्या नावे असलेल्या मालमत्ता क्रमांक ४२०/२ घरामध्ये मध्ये वास्तव्यास आहेत. त्यांच्या घर, दुकान तसेच लगतच्या मोकळ्या जागेची मालमत्ता पंचायत नोंद करून त्यांना उतारा देण्यासाठी पंचायत सेक्रेटरी बळ्ळारी यांनी २२ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १५ हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती, उर्वरित रक्कम काम पूर्ण झाल्यानंतर देण्याचे ठरले होते. त्यानंतर व्यंकाप्पा यांनी लोकायुक्त पोलिसांकडे धाव घेतली.
लोकायुक्त जिल्हा पोलिस प्रमुख प्रसन्न देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला. अतिरिक्त लोकायुक्त पोलिस प्रमुख भरत एस. आर., पोलिस निरीक्षक संगमनाथ एच. होसमणी, पोलीस कर्मचारी बसवराज हुद्दार संतोष बेडगी, शशी देवरमणी, अभिजित जमखंडी, प्रकाश माळी, गुडाप्पा गोरवळ या सर्वांनी या कारवाईत भाग घेतला होता. लोकायुक्त पथकातील कर्मचाऱ्यांनी कारवाई करत संशयित महांतेश बळ्ळारीला १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली.