

बेळगाव : उत्तर परिक्षेत्राच्या पोलिस महानिरीक्षकपदी (आयजीपी) म्हणून संदीप पाटील यांची नियुक्ती झाली आहे. विद्यमान आयजीपी डॉ. चेतनसिंग राठोड यांची आर्थिक गुन्हे विभागाचे आयजीपी म्हणून बदली झाली आहे.
राज्यातील तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश बुधवारी राज्याचे अवर सचिव संजय बी. एस. यांनी बजावला. यामध्ये सध्या राज्य राखीव पोलिस दलात आयजीपीपदी कार्यरत असलेले संदीप पाटील यांची नियुक्ती उत्तर परिक्षेत्राचे आयजीपी म्हणून झाली आहे. येथे कार्यरत आयजीपी डॉ. राठोड यांची आर्थिक गुन्हे तपास विभागाचे आयजीपी म्हणून बदली झाली आहे. संदीप पाटील यांच्या जागी आयपीएस अधिकारी अनुपम अग्रवाल यांची बदली झाली आहे.
संदीप पाटील यांनी २ सप्टेंबर २०१० ते ६ जुलै २०१३ या सुमारे तीन वर्षांच्या कालावधीत बेळगावचे जिल्हा पोलिसप्रमुख म्हणून काम केले. एक दक्ष आणि कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांनी आपली कारकिर्द गाजवली होती. त्यांच्या काळात बेळगाव शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारीचे प्रमाण कमालीचे घटले होते.
पोलिस आयुक्तालय नसतानाही त्यांनी शहरासह जिल्ह्यावर चांगला वचक ठेवला होता. त्यांची गाजलेली कारकीर्द व त्यांच्या काळातील पोलिस सेवा बेळगावकर आजही विसरलेले नाहीत. असे कार्यतत्पर अधिकारी आता उत्तर परिक्षेत्राचे आयजीपी झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या पूर्वीच्या जागी बदली झालेले अनुपम अग्रवाल हे देखील बेळगावला कायदा व सुव्यवस्था विभागाचे डीसीपी म्हणून कार्यरत होते. त्यांची कारकीर्दही बेळगावात चांगलीच गाजली होती.