Belgaum Cable Theft : सदलग्यात शेतीपंपांच्या केबल चोरीचे सत्र

विद्युत मोटारींच्या केबल चोरीचे प्रमाण वाढल्याने शेतकरी हैराण
Belgaum Cable Theft : सदलग्यात शेतीपंपांच्या केबल चोरीचे सत्र
Published on: 
Updated on: 

सदलगा : दूधगंगा नदीकाठावरील शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत मोटारींच्या तांब्याच्या केबल चोरीचे सत्र सुरूच आहे. सदरगासह परिसरात विद्युत मोटारींच्या केबल चोरीचे प्रमाण वाढल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.

शेतकरी तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेल्यानंतर त्यांच्या तक्रारीची नोंद कच्च्या वहीत घेतली जात आहे. याबाबत एफआयआर दाखल करून घेतला जात नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. चोरीच्या घटनास्थळी भेट देणारे पोलिस शेतकऱ्यांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा आग्रह करीत असल्याचेही सांगण्यात येते.

मलिकवाड येथे केबल चोरी झालेल्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा असूनही चोरीच्या घटना घडल्याबाहेत. ११ नोव्हेंबर रोजी द्रविड शेरी आणि हाळ-खडकुळी परिसरात सुमारे २५ ते ३० शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्या. त्यानंतर ८ दिवसांतच मारुती मंदिराच्या मागील बाजूस नदीकाठावर अंदाजे १५ शेतकऱ्यांच्या केबल चोरी झाल्या. त्याच रात्री दूधगंगेच्या उत्तर तीरावरील एका शेतकऱ्याची ५ अश्वशक्तीची विद्युत मोटार चोरून नेण्यात आली.

या घटना ताज्या असतानाच गुरुवारी पहाटे हाळ-खडकुळी परिसरात पुन्हा सुमारे १० ते १२ शेतकऱ्यांच्या केबल चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. सिंचनाची गरज लक्षात घेऊन शेतकरी वारंवार नव्या केबल जोडून पिकांना पाणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. १५ दिवसांत वारंवार केबल आणि विद्युत मोटारींच्या चोरीच्या घटना घडल्याने सदलगा पोलिसांपुढे तपासाचे मोठे आव्हान उभे ठेपले आहे.

दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेतकरी आधीच आर्थिक अडचणीत आहेत. त्यात केबल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे त्यांच्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. चिकोडी तालुक्यातील दूधगंगा आणि कृष्णा नदीकाठच्या शेतांमध्ये बसविलेल्या विद्युत मोटारी व केबल चोरीमुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.