Belgaum Fraud Case: बेळगावकरांना २६ कोटींना फसवणाऱ्याला अटक

श्रीदेवी कुगे व्हेंचर्सचा संचालक जेरबंद : २० महिन्यांत दामदुपटीचे आमिष, २५४ जणांकडून उचलले पैसे
Fraud
FraudPudhari
Published on
Updated on

बेळगाव : अवघ्या वीस महिन्यांमध्ये दामदुपटीचे आमिष दाखवत कंपनी उघडून तब्बल २६ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या मुख्य संशयिताला सोमवारी माळमारुती पोलिसांनी अटक केली. सुबोध होन्नाप्पा कुगे (वय २१, मूळ रा. जलालपूर, ता. रायबाग, सध्या रा. महांतेशनगर, बेळगाव) असे संशयिताचे नाव आहे. या प्रकरणातील दुसरा संशयित प्रमोद फकीराप्पा हळेमनी (वय ४९, रा. सत्ती, ता. अथणी) याला १८ जून रोजी अटक झाली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी : बेळगावात शिवम असोसिएटस्‌ नावाच्या कंपनीचा गैरव्यवहार उघडकीस आला. या काळात बेळगावात श्रीदेवी कुगे व्हेंचर्स प्रा. लि. या कंपनीविरोधात प्रवीण चंद्रशेखर दोड्डमनी (रा. केशवनगर, धारवाड) यांनी फिर्याद दिली. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, या कंपनीने काहीजणांकडून लाखाला दरमहा पाच टक्के परतावा व यानंतर २० महिन्यांनी गुंतवलेली लाख रुपयांची रक्कमही परत देऊ, असे सांगत गुंतवणूक करून घेतली होती; परंतु आता परतावा व मूळ मुद्दल परत मिळत नसल्याचे फिर्यादीत म्हटले होते.

माळमारुती पोलिसांनी केपीआयडी ॲक्ट व अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. प्राथमिक चौकशी केली असता सुरुवातीला काहीजणांकडून २ कोटी ८० लाख रुपयांची रक्कम संशयितांनी घेतल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी जेव्हा याचा सखोल तपास सुरू केला तेव्हा अशा पद्धतीने या कंपनीने सुमारे २५४ जणांकडून २५ कोटी ७९ लाख रुपयांची गुंतवणूक करून घेतल्याचे आढळून आले.

या कंपनीचा मार्गदर्शक असलेल्या प्रमोद हळेमनी याला गेल्या महिन्यात अटक केली. मुख्य संशयित सुबोध कुगे याला सोमवारी अटक झाली. त्याला न्यायालयासमोर उभे करत पोलिसांनी न्यायालयामार्फत अधिक चौकशीसाठी पोलिस कोठडीत घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news