

बेळगाव : सीमाभागातील मराठी जनतेला न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नावर कठोर आणि ठोस भूमिका घ्यावी, अशी आमची सातत्यपूर्ण मागणी आहे. येथील अस्मितेच्या संरक्षणासाठी आम्ही कायम ठामपणे उभे राहू, अशी ग्वाही आमदार रोहित पाटील यांनी दिली.
खानापूर येथील ग्रंथालय उदघाटनासाठी आलेले आमदार पाटील यांनी शुक्रवारी (दि. १५) राष्ट्रवादी काँग्रेसचे अमित देसाई यांच्या निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला.
आमदार पाटील म्हणाले, सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अस्मितेला धक्का देण्याचे प्रयत्न काही संघटनांकडून सातत्याने होत आहे. आर. आर. पाटील (आबा) आणि बेळगावचे नाते अतिशय जिव्हाळ्याचे होते. महाराष्ट्र एकीकरण समितीशी असलेला भावनिक संबंध आणि सीमाभागातील मराठी माणसाविषयी असलेली आत्मीयता आम्हाला नेहमीच बेळगावकडे खेचून आणते. या भागातील मराठी अस्मिता जपली गेली पाहिजे, ही आमची ठाम भावना आहे. त्यामुळे आम्ही सातत्याने सीमाभागातील मराठी बांधवांच्या संपर्कात राहत असतो.
ते म्हणाले, महाराष्ट्राच्या मागील अधिवेशनात सीमाभागातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना नापास केल्याच्या मुद्द्यावर आम्ही विधिमंडळात आवाज उठवला होता. काही ठिकाणी जातीयवाद, धर्मांधता, भाषा आणि प्रांतवादाच्या आधारे अल्पसंख्याक समाजांना त्रास दिला जातो. बेळगाव सीमाभागातही काही संघटना मराठी भाषिकांच्या अस्मितेला धक्का देण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मराठी माणसाच्या सन्मानाच्या रक्षणासाठी आम्ही कायम उभे राहू.
यावेळी माजी महापौर सरिता पाटील, माजी नगरसेविका वैशाली भातकांडे, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, शिवाजी देसाई, किरण हुद्दार, श्रीकांत कदम, अजिंक्य देसाई, डॉ. विराज पाटील, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.