

बेळगाव : वाहनाला ओव्हरटेक करताना क्वीड कारची समोरुन येणाऱ्या इनोव्हा कारला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात भाऊ-बहिण ठार झाले. तर मुलगा आणि आई गंभीर जखमी झाले आहेत. बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रामनगरजवळील अस्तोलीत बुधवारी (दि. 28) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला.
रुद्राप्पा शिवण्णावर (वय 77) व त्यांची बहीण रेणुका हिरेमठ (वय 60, दोघेही मूळ लक्ष्मेश्वर-हुबळी सध्या रा. फोंडा गोवा) अशी मृतांची नावे आहेत. तर कारचालक मुलगा शिवराज (वय 28) आणि मागे बसलेली त्यांची पत्नी बसव्वा (वय 70) गंभीर जखमी झाले आहेत. क्वड कार (जीए 04 ई 8055) रामनगरहून गोव्याच्या दिशेने जात होती. अस्तोलीजवळ एका ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात तिची समोरुन येणाऱ्या इनोव्हा कारला जोराची धडक बसली. त्यात कारचालकाच्या बाजूला बसलेले रुद्राप्पा तसेच मागे बसलेली त्यांची बहीण रेणुका यांचा जागीच मृत्यू झाला.