

चिकोडी : मोटारसायकलला भरधाव वाहनाने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे ठार झाल्याची घटना सोमवारी (दि. 26) घडली. हा अपघात इटनाळ गावच्या हद्दीत निपाणी-मुधोळ राज्य महामार्गावर घडला. प्रकाश रामप्पा निडसोसी (वय 40) आणि मारुती काडाप्पा बंबलवाड (वय 45, दोघे रा. डोणवाड, ता. चिकोडी) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निपाणी-मुधोळ रस्त्यावर प्रकाश हे मारुती यांच्यासह मोटारसायकलवरून बेळकूड गेटकडे जात होते. यावेळी बेळकूट गेटकडून भरधाव येणाऱ्या वाहनाने मोटारसायकलला धडकली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने चिकोडीतील दवाखान्यात हलविण्यात आले. त्यानंतर सरकारी दवाखान्यातून प्रकाश यांना चिकोडीतील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. मारूती यांच्यावर सरकारी दवाखान्यात उपचार करून बेळगावला खासगी रूग्णालयात व तेथून हुबळीला पाठविण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असताना मृत्यू झाला. चिकोडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चिकोडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून उपनिरीक्षक बसनगौडा नेर्ली तपास करत आहेत.