

बेळगाव : एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने तांदळाचे दुकान सुरु करुन देतो, असे सांगून 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार एका व्यक्तीने उत्तर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक व जिल्हा पोलिसप्रमुखांकडे केली आहे. महांतेश होटकर (रा. बैलहोंगल) असे त्याचे नाव असून आपल्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे त्याने तक्रारीत म्हटले आहे.
होटकर यांनी उच्चपदस्थ निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने आपली फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तांदळाचा व्यवसाय सुरु करुन देण्याचे आश्वासन त्या अधिकाऱ्याने दिले. त्यासाठी 12 लाख रुपये लागणार, असे सांगून रक्कम पाठविण्यास सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून 2017 ते 2019 या काळात अधिकाऱ्याची पत्नी आणि मुलाच्या बँक खात्यात 12 लाख रुपये जमा केले. मात्र, नऊ वर्षे उलटली तरी त्या अधिकाऱ्याने मला दुकान घालून दिले नाही.
मी माझे पैसे परत मागितले तर ते पैसे देण्यास तयार नाहीत. त्यामुळे, माझे मोठे नुकसान झाले असून आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे, मला न्याय द्यावा अशी मागणी होटकर यांनी केली आहे. याबाबतची तक्रार त्यांनी टिळकवाडी पोलिस ठाण्यातही केली आहे.