

बेळगाव : लाल, पिवळा, गुलाबी, निळा अशा रंगांची मुक्त उधळण, ओळखू न येणारे चेहरे, सकाळपासून हातात रंग आणि भरलेली पिचकारी घेऊन एकमेकांना रंगवण्यात गुंतलेली चिमुकली मुले, कुटुंबातील सदस्यांसोबत रंगून गेलेले आबालवृद्ध, डीजेवरील ठेक्यावर जलतुषारात सामूहिकपणे चिंब भिजणारे नागरिक, मैत्रीच्या नात्याला रंगांनी अधिक गहिरे करणार्या युवक-युवतींचा उत्साह आणि सप्तरंगाची उधळण करत शुक्रवारी (दि. 14) शहरात रंगोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. जलतुषारांची यंत्रणा, पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरासमोरील लोटांगण, ‘होली मिलन’ अशा कार्यक्रमांनी धूलिवंदनाची रंगत आणखी वाढली.
होळीनंतर येणार्या धूलिवंदनाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतो. गरीब-श्रीमंत, लहान-मोठा असा भेद विसरायला लावणार्या आणि मनामनातील कटुता रंगांनी पुसून टाकणार्या या सणाला बच्चेकंपनीच्या किलबिलाटाने सुरुवात झाली. सकाळी हातात वेगवेगळे रंग घेऊन लहान मुलांनी एकमेकांना रंगवायला सुरुवात केली. दारात ठेवलेल्या बादलीतून पिचकारी भरून मित्र-मैत्रिणींना चिंब भिजवताना त्यांचा होणारा जल्लोष लक्ष वेधून घेत होता. त्यांच्यासोबत रंग खेळताना मोठेही लहान झाले आणि मुलांचा उत्साह दुणावला. सकाळी नऊनंतर घरातील आबालवृद्धांना घराबाहेर बोलावून रंगोत्सवात सामावून घेतले जात होते. वृद्ध मंडळींना हातात रंग देऊन किंवा चेहर्याला रंग लावून शुभेच्छा दिल्या जात होत्या.
गल्लोगल्लीत डीजेचे सूर आणि तरुणाईचे नृत्य एवढेच वातावरण होते. सकाळी दहानंतर नृत्य करणार्या तरुणाईंच्या संख्येत वाढ होत राहिली. युवक आणि युवतीही गीतसंगीताच्या तालावर थिरकत होत्या. महिलांनाही मुक्तपणे रंग खेळण्याचा अनुभव मिळावा, यासाठी अनेक भागांमध्ये खास साऊंड सिस्टीम आणि पाण्याच्या शॉवरची सोय करण्यात आली होती. लोकांसह रस्तेही सप्तरंगी रंगात रंगून निघाले होते. गल्लीमध्ये रंगांची धूम सुरू असताना शहरातील चौका-चौकांत, रस्त्याकडेलाही अनेक पुरुष, युवक रंग खेळताना दिसत होते. त्यामुळे सकाळपासून दुपारपर्यंत फक्त रंगोत्सव साजरा होत होता. दुपारी दोनपर्यंत रंगोत्सवाचा माहोल होता.
जागृतीमुळे काही पालकांनी आपल्या मुलांना पर्यावरणपूरक रंग उपलब्ध करुन दिले. शहरातील रंगोत्सवात ग्रामीण भागातील उत्साही तरुणही सहभागी झाले होते. एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देत ते नृत्यात सामील होत होते. सकाळपासून दुपारी तीनपर्यंत शहरात बंदसदृश वातावरण होते. सर्व दुकाने बंद ठेवण्यात आल्याने फक्त रंगात न्हालेले लोक नजरेस पडत होते. अन्य ठिकाणी शुकशुकाट जाणवत होता. दुपारनंतर वाहतूक सुरळीत सुरु झाली.
पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरात पारंपरिक लोटांगण कार्यक्रम पार पडला. मूर्तीला अभिषेक घालून आरती व पूजा करण्यात आली. गार्हाणे घातल्यानंतर लोटांगणाचा कार्यक्रम झाला. लोटांगण घालण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दुपारी आरती झाल्यानंतर उत्सवाची सांगता झाली. दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात धुलिवंदनानिमित्त रंगांची आकर्षक आरास करण्यात आली होती. दुपारनंतर भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. हुल्लडबाजी होऊ नये यासाठी ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात होता. मंगळवारी वडगाव, शहापूर, खासबाग परिसरात परंपरेनुसार पाचव्या दिवशी रंगोत्सव साजरा होणार आहे.
यंदा विविध गल्लीत शॉवरची सोय करण्यात आल्याने तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले होते. खडक गल्ली, चव्हाट गल्ली, पांगुळ गल्ली, गोंधळी गल्ली, कडोलकर गल्ली, मेणसे गल्ली, ताशीलदार गल्ली, रामलिंगखिंड गल्ली तसेेच अनगोळ येथेही डीजे आणि शॉवरची सोय करण्यात आली होती. आ. अभय पाटील यांच्या पुढाकारातून झालेल्या व्हॅक्सिन डेपो मैदानावरील ‘होली मिलन’ला तरुणाईचा प्रतिसाद मिळाला. सकाळी नऊ वाजल्यापासून एकत्रित जमलेल्या युवक- युवतींनी सामूहिक रंगोत्सवाचा आनंद लुटला.