

बेळगाव : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धजन्य परिस्थिती असली, तरी इस्रायलमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना सतर्क केले जाते. इराणहून एखादे क्षेपणास्त्र इस्रायलच्या दिशेने झेपावताच मोबाईलवर मेसेज येतो. यावेळी सर्वत्र एकच धावपळ उडते. मात्र, ती धावपळ गोंधळाची नसून नियोजित असते. इस्रायलमधील प्रत्येक इमारतीखाली पार्किंगप्रमाणेच ‘बंकर’ची व्यवस्था केलेली असते. रस्त्यावर असलेले लोकही जवळच्या सार्वजनिक बंकरमध्ये धाव घेतात. क्षेपणास्त्र हल्ल्याच्या वेळी हे बंकरच लोकांसाठी जीवरक्षक ठरतात.
गेल्या सहा वर्षांपासून इस्रायलची राजधानी तेल अवीव येथे स्थायिक असलेले विनायक कुंभार (तोपिनकट्टी, ता. खानापूर) यांनी तिथल्या थरारक आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा अनुभव कथन केला आहे. इराणकडून होणारे क्षेपणास्त्र हल्ले आणि त्यादरम्यान इस्रायली नागरिक कशा प्रकारे स्वतःचा बचाव करतात, याचे जिवंत चित्र त्यांनी मांडले आहे. कुंभार यांच्या माहितीनुसार, जेव्हा एखादे क्षेपणास्त्र इस्रायलच्या दिशेने झेपावते, तेव्हा प्रत्येकाच्या मोबाईलवर तत्काळ एक आपत्कालीन संदेश येतो. हा संदेश येताच लोकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याची सूचना दिली जाते. धोका टळला की पुन्हा एकदा प्रत्येकाच्या मोबाईलवर ‘धोका टळल्याचा’ संदेश येतो. हा मेसेज मिळताच लोक बंकरबाहेर येतात आणि पुन्हा आपापल्या कामाला लागतात. युद्धाच्या या छायेतही इस्रायली लोकांचे हे रोजचे जीवन बनले असून, तिथली शिस्त आणि तंत्रज्ञानाची साथ यामुळेच इतक्या मोठ्या संकटकाळातही जनजीवन सुरू असल्याचे सांगितले.
बंकर म्हणजे केवळ एक खोली नसून, ती एक ‘लाईफ सपोर्ट सिस्टीम’ असते. त्यात रासायनिक हल्ल्यांपासून बचावासाठी हवा शुद्धीकरण यंत्रणा, तिथे साठवून ठेवलेले सुके अन्न आणि पाण्याचे साठे, अपडेट राहण्यासाठी वायफाय किंवा रेडिओ सुविधा असतात. युद्धजन्य परिस्थितीत लहान मुलांना ‘बंकर ड्रिल’चे प्रशिक्षण शाळेतूनच दिले जाते. भीतीऐवजी शिस्तीचे पालन केले जाते. तेल अवीवमध्ये अनेक भारतीय राहतात.