

बेळगाव : काँग्रेसच्या नेतृत्वाखाली राज्यात कार्यरत असणारे सरकार लोकाभिमुख आहे. जनतेच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात येते. बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 140 मंदिरांचा जीर्णोद्धार केला आहे, असे मत महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.
केके कोप्पमध्ये (ता. बेळगाव) उभारण्यात येणार्या व्यंकटेश्वर मंदिर, हेमरेड्डुी मल्लम्मा ध्यान मंदिर आणि कल्याण मंडपाच्या बांधकामाचा भूमिपूजन कार्यक्रम शुक्रवारी (दि. 6) झाला. त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरुन बोलत होत्या. हरिहर एरेहोसळ्ळी रेड्डी गुरुपीठाचे वेमनानंद स्वामी, परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी, कायदा मंत्री एच. के. पाटील, खासदार इराण्णा कडाडी, आमदार राजू सेट प्रमुख पाहुणे होते.
त्या पुढे म्हणाल्या, ग्रामीण मतदारसंघात अनेक मंदिरे बांधली जात आहेत. हा एक प्रकारचा आशीर्वाद आहे, असे मला वाटते. मी मंदिराच्या बांधकामासाठी आवश्यक सहकार्य करेन. पुढील काळात याठिकाणी शिक्षण संस्था सुरु केल्यास सर्व प्रकारचे सहकार्य करेन. राज्यातील आमचे सरकार सामान्य जनतेचे आहे. बेळगाव हे वेगाने वाढणारे शहर आहे. पर्यटनाच्या दृष्टीने हे ठिकाण विकसित केले जाईल. आमदार झाल्यानंतर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात 140 मंदिरे उभी केली, असेमंत्री हेब्बाळकर यांनी स्पष्ट केले.
तत्पूर्वी मंत्री हेब्बाळकर, मंत्री पाटील यांनी कुदळ मारुन मंदिराचे भूमिपूजन केले. कार्यक्रमाला माजी आमदार डी. आर. पाटील, आर. व्ही. पाटील, इंदिराबाई मळली, बालाजी मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष रामण्णा मुल्लूर, डॉ. गिरीश सोनवलकर, रमेश जंगली, एन. व्ही. बरमणी, पांडुरंग रेड्डी उपस्थित होते.