

बेळगाव : जागतिक स्तरावरील नामांकित संस्था ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने जाहीर केलेल्या ‘ग्लोबल सिटीज इंडेक्स २०२६’ मध्ये बेळगावने ६८३ वा क्रमांक पटकावला आहे. जगातील सर्वात मोठ्या १,००० शहरांच्या या यादीत बेळगावने द्वितीय दर्जाच्या शहरांमध्ये स्थान मिळवले आहे. बेळगावला १०० पैकी ३०.९ गुण मिळाले आहेत.
ग्लोबल सिटीज इंडेक्समध्ये कर्नाटकातील एकूण ६ शहरांना स्थान मिळाले असून, बेळगावने हुबळी-धारवाड आणि गुलबर्गा या शहरांना मागे टाकले आहे. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने शहरांचे मूल्यमापन पाच प्रमुख निकषांच्या आधारे केले होते. यामध्ये पर्यावरण निकषामध्ये सर्वाधिक ६२.८ गुण मिळवत पर्यावरण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. शहराचे उत्तम हवामान आणि हरित क्षेत्र यामुळे चांगले गुण मिळाले आहेत.
नागरी व्यवस्थापन आणि प्रशासकीय सुशासनासाठी शहराला ५७.४ गुण मिळाले आहेत. राहणीमान, आरोग्य सुविधा आणि मूलभूत पायाभूत सुविधांमध्ये शहराने ४०.३ गुणांसह समाधानकारक कामगिरी केली आहे. आर्थिक स्थैर्य आणि जीडीपी वाढीच्या बाबतीत शहराला ३४.४ गुण मिळाले असून, येथे भविष्यात वाढीला मोठी संधी आहे, असे नमूद करण्यात आले आहे. कुशल कामगार, शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या बाबतीत बेळगावला २५.३ गुण मिळाले आहेत. या क्षेत्रात शहराला अधिक सुधारणा करण्याची गरज आहे. जागतिक यादीत बंगळूरला ३११ वा, म्हैसूरला ६२८, मंगळूरला ६६५, बेळगावला ६८३, हुबळी-धारवाडला ७०७ आणि गुलबर्ग्याला ७८१ वा क्रमांक मिळाला आहे.
देशात दिल्ली प्रथम
ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या ग्लोबल सिटीज इंडेक्स अहवालानुसार, जगातील एक हजार सर्वात मोठ्या शहरांच्या यादीत भारतामधील एकूण ९१ शहरे समाविष्ट आहेत. यामध्ये नवी दिल्लीने २६७ वा क्रमांक पटकावून देशात पहिले स्थान पटकावले असून त्याच्या पाठोपाठ बंगळूर, मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद शहराने क्रमांक पटकावला आहे.