

बेळगाव : केंद्र सरकारने भाषावार प्रांतरचना करताना मराठीबहुल सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ 1 नोव्हेंबर काळा दिन पाळण्यासह परवानगी मिळो वा न मिळो निषेध फेरीत बहुसंख्येने सहभागी होण्याचा निर्धार तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला. कार्यकर्त्यांनीही निषेध फेरीतून मराठी माणसाची ताकद दाखविण्याचा निश्चय केला.
तालुक़ा महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक रविवारी (दि. 19) मराठा मंदिरमध्ये पार पडली. अध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकर अध्यक्षस्थानी होते. सरचिटणीस ॲड. एम. जी. पाटील, आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण होनगेकर व्यासपीठावर होते.
माजी आमदार किणेकर म्हणाले, सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबण्यात आल्याच्या निषेधार्थ गेल्या 70 वर्षांपासून सीमाभागात काळ दिन पाळला जातो. या दिनी केंद्र सरकारचा निषेध करत मूक निषेध फेरी काढली जाते. त्यामुळे, प्रत्येक मराठी माणसाने या फेरीत सहभागी होऊन आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
काळ्या दिनाच्या निषेध फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी गावोगावी विभागवार जागृती केली जाणार असून मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. मनोहर हुंदरे, अनिल पाटील, शिवाजी खांडेकर, आर. के. पाटील, दीपक पावशे, मनोहर संताजी, पीयूष हावळ आदींनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी कमल मन्नोळकर, मल्लाप्पा पाटील, महादेव बिर्जे, मारुती शिंदे, राजू किणयेकर, संतोष बांडगी, आप्पासाहेब किर्तने यांच्यासह समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.