Belgaum News: फक्त चर्चा नाही, मोर्चा!

प्रशासनाकडून भलावणीचा प्रयत्न; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली समिती नेत्यांची बैठक
Belgaum News: फक्त चर्चा नाही, मोर्चा!
Published on
Updated on

बेळगाव : मराठीसाठी मोर्चा न काढता थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या, चर्चा करूया, असे सांगून भलावण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांना म. ए. समिती नेत्यांनी मराठीसाठी तुम्ही ठोस ग्वाही देत नाही, त्यामुळे आम्ही मोर्चा काढणारच, असा निर्धार असल्याचे सांगितले.

मराठी कागदपत्रे आणि सरकारी कार्यालयांवर मराठी फलकांसाठी २२ जून रोजी मोर्चा काढण्याचा निर्धार करताच जिल्हा प्रशासन धास्तावले असून मंगळवारी म. ए. समिती नेत्यांशी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलिस आयुक्त भूषण बोरसे, उपायुक्त नारायण बरमणी यांनी चर्चा केली. मराठी हक्कासंदर्भात समिती स्थापन करून प्रश्न सोडविण्यात येतील, अशी भलावण पुन्हा करण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी केला; पण त्याचवेळी मराठी भाषिकांना घटकात्मक हक्क देण्यासंदर्भात आपण काहीही करू शकत नाही, असे सांगून हात वर केले.

बैठकीत समिती नेत्यांनी सरकारी नियमाप्रमाणे कार्यालयांवर मराठीतूनही फलक असले पाहिजेत, त्यामुळे त्या नियमाचे पालन जिल्हाधिकारी कार्यालयापासूनच करण्यात यावे, असा आग्रह धरला. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे; पण मराठी भाषेतून कागदपत्रे, फलक असणे हा आमचा अधिकार आहे. त्याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने करावी, यासाठी आमचा मोर्चा निघणार आहे, असेही सांगितले. तर केरळम्‌ येथील कासरगोड परिसरात कन्न्‍नड‍ भाषिकांचे हक्क सरकार जपत आहे. त्याप्रमाणे आम्हालाही आमचे भाषिक हक्क देण्यात यावेत, अशी मागणी केली.

समिती नेत्यांच्या मागणीनंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी मोर्चा न काढता सर्वांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमावे. त्या ठिकाणी मी तुमच्याशी चर्चा करतो. तुमच्या हक्कांसाठी समिती स्थापन करण्यात येईल, असे सांगितले. त्यावर समिती नेत्यांनी तुम्ही आताच फलकांवर मराठी भाषा लिहिण्यात येईल, सांगा आम्ही मोर्चा काढणार नाही, असे सांगितले; पण त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर दिले नाही. यावेळी पोलिस आयुक्त भूषण बोरसे, उपायुक्त नारायण बरमणी यांनीही मोर्चा काढू नका, असे आवाहन केले. तुमच्यासाठी आम्हाला हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवावा लागतो, असे सांगितले. प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी रोहित सिंग व इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते.

मध्यवर्ती म. ए. समिती अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, रणजित चव्हाण-पाटील, मदन बामणे, ॲड. एम. जी. पाटील, आबासाहेब दळवी, पंढरी परब, सुनील बाळेकुंद्री, अंकुश केसरकर, संतोष कृष्णाचे, खानापूर समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, नेताजी जाधव, श्रीकांत कदम, सुरज कुडुचकर, रामचंद्र मोदगेकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news