

बेळगाव ः नगर विकास खात्याने अखेर घरपट्टीवरील पाच टक्के सवलतीला 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे, महापालिकेच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
घरपट्टीवरील पाच टक्के सवलतीला मुदतवाढ दिली जावी, असा प्रस्ताव नगर प्रशासन खात्याने नगरविकास खात्याकडे पाठविला होता. तो प्रस्ताव नगर विकास खात्याने मंजूर केला आहे. स्वयंघोषित कर आकारणीत आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात घरपट्टी भरल्यास त्यावर पाच टक्के सवलत दिली जाते. त्यानुसार चालू आर्थिक वर्षात 1 ते 30 एप्रिल या काळात ज्यांनी घरपट्टी भरली. त्यांना पाच टक्के सवलत देण्यात आली.
राज्य शासनाकडून बंगळूर महापालिकेत या सवलतीला मुदतवाढ देण्यात आली. पण, बेळगावसह राज्यातील अन्य नगर स्थानिक स्वराज्य संस्थांना ही मुदतवाढ मिळाली नव्हती. पण, महापालिकेने पाठपुरावा केल्यामुळे अखेर पाच टक्के सवलत मुदत वाढविण्यात आली. पाच टक्के सवलतीमुळे एप्रिलमध्ये महापालिकेला 30 कोटी घरपट्टी मिळाली होती. आता मे व जून या दोन्ही महिन्यात ही सवलत कायम राहणार असल्याने घरपट्टी वसुली वाढणार आहे.