

बेळगाव : आंतरराज्य चोरट्यांच्या टोळीला अटक करुन त्यांच्याकडून तब्बल एक कोटी २६ लाख ५२ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गदग जिल्ह्यातील बेटगेरी पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेल्या संशयितांमध्ये बेळगाव, धारवाड, हावेरीसह मुंबईतील चोरट्यांचा समावेश आहे. बेटगेरीचे पोलिस निरीक्षक धीरज शिंदे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
एका प्रकरणात आठ चोरट्यांना अटक करुन त्यांच्याकडून ९० लाखांचे ६०० ग्रॅम सोन्याचे दागिने, दहा लाखांची चार किलो चांदी, दोन दुचाकी व कार असा तब्बल एक कोटी ७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणात अटक केलेल्यांमध्ये सुरेश ऊर्फ सन्नसुरेश सत्याप्पा सिंगनूर (वय २७, रा. काद्रोळी, ता. कित्तूर, जि. बेळगाव), नागाप्पा तिम्माप्पा दुरगमुरगी (वय ४५, रा. अळणावर, जि. धारवाड), शिवु सुंकाप्पा बेळगंटी (वय २४, रा. गरज, जि. धारवाड), सुरेश ऊर्फ दोड्डसुरेश बाबू तम्मण्णावर (वय ३५, रा. दड्डी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव), शंकर ऊर्फ कुड्डशंकर यल्लाप्पा करी (वय २४, रा. वेंकटपूर, जि. धारवाड) मंजुनाथ नागराज बादगी (वय ३०, रा. धारवाड), हुलगेप्पा फकीराप्पा बेळगालपेट (वय १९, रा. बेळगालपेट, ता. हनगल, जि. हावेरी) व आनंद दुर्गाप्पा यरगण्णावर (वय २१, रा. मुनवळ्ळी, जि. धारवाड) यांचा समावेश आहे.
दुसऱ्या एका प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक करुन त्यांच्याकडून १९ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये ११६ ग्रॅम सोन्याचे दागिने ५१५ ग्रॅम चांदीचा समावेश आहे. या प्रकरणात गंगाराम बैराम चव्हाण (वय ५०, रा. मोगाबी, ता. आळंद, जि. गुलबर्गा), कनिराम कमसर चव्हाण (वय ६०, आळंद, जि. गुलबर्गा) व श्रीकांत शरणाप्पा दुधाळे ऊर्फ पुजारी (वय ४४, मोगाबी, ता. आळंद सध्या रा. मुंबई) या तिघांना अटक केली आहे.
गदगचे जिल्हा पोलिसप्रमुख रोहन जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली बेटगेरीचे पोलिस निरीक्षक धीरज शिंदे, उपनिरीक्षक आय. एस. लमाणी, साहायक उपनिरीक्षक बी. एफ. यरगुप्पा व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.