

बेळगाव : पहिल्या रेल्वे फाटकावरील बॅरिकेड्सची पाहणी गुरुवारी पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी केली. मानव हक्क आयोगाकडून सूचना आल्यानंतर आयुक्तांनी पहिल्या गेटकडे धाव घेतली. त्यांच्यासमोरच बॅरिकेड हटाव संघटनेचे अध्यक्ष निवृत्त मुख्याध्यापक सुभाष घोलप यांनी बैठे आंदोलन छेडले.
बेळगाव भेटीवर 7 जानेवारी रोजी आलेले मानव हक्क आयोगाचे अध्यक्ष टी. शाम भट्ट यांची सुवर्णसौधमध्ये भेट घेऊन बॅरिकेड्स हटाव संघटनेने 275 पानांची फाईल सादर केली होती. त्याची दखल सोमवारी आयोगाकडून घेण्यात आली. त्यानुसार गुरुवारी (दि.15) पोलिस आयुक्त बोरसे यांनी घटनास्थळी पाहणी करत स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. गुरुवारी घोलप यांनी आयुक्तांसमोरच बैठे आंदोलन छेडले. साडेअकरा वर्षापासून टिळकवाडी पहिल्या गेटवरील बॅरिकेड्स हटवण्यासाठी आपण लढा देत आहे. बॅरिकेड्समुळे शॉर्टकटच्या नादात काँग्रेसरोडवर अनेकांचे बळी पडले आहेत. पलिकडे जाण्यासाठी लोक जीव धोक्यात घालून दुभाजक ओलांडतात. त्यामुळे बॅरिकेड्स त्वरीत हटवावेत, अशी मागणी घोलप यांनी केली.