

बेळगाव : शंभर कोटींची आशा दाखवत ऑनलाईन सात लाखांचा गंडा घातल्याच्या घटनेची नोंद जिल्हा सीईएनमध्ये झाली आहे. या प्रकरणई यरगट्टी तालुक्यातील राजकीय नेत्याने याबाबतची फिर्याद दिली आहे.
महिला व तरुणींच्या नावे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून फसवणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही दिवसांपूर्वी यरगट्टी येथील एका राजकीय नेत्याला फेसबुक फ्रेन्ड रिक्वेस्ट आली. रोशनगेला पाज असे आपले नाव दाखवत या महिलेने आपण लंडनमध्ये वास्तव्यास असल्याचे समोरच्याला सांगितले. त्यानंतर चॅटिंग सुरू झाले व एकमेककांच्या मोबाईल व्हॉटस्ॲपच्या क्रमांकाची देवाणघेवाणही झाली. आपले तुझ्यावर प्रेम आहे आणि या बदल्यात मी तुला आपल्या प्रेमाची भेट म्हणून ८० लाख पाऊंड करन्सी पाठवणार आहे. ज्याचे मूल्य भारतीय चलनात १०२ कोटी रूपये इतके होते. परंतु, इतक्या मोठ्या रक्कमेचा धनादेश वटण्यासाठी काही तांत्रिक अडचणी असल्याचे तिने सांगितले. यासाठी आधी तू मला भारतीय चलनात २ लाख रूपये पाठव, असे सांगितले.
महिलेवर विश्वास ठेवून त्याने दोन लाख पाठवले. परंतु, अद्यापही रक्कम पाठवायला हवी, असे म्हणत आणखी ५ लाख ५ हजार रूपये घेतले. त्यानंतर ती महिला गायब झाली. कारण, तिने आपला मोबाईल स्विच ऑफ केला. आपण फसल्याचे लक्षात येताच या ५३ वर्षीय राजकीय नेत्याने जिल्हा सीईएनमध्ये फिर्याद दिली. पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदिश्वर तपास करीत आहेत.