

Nipani Bhatnangnur jawan death Pune
निपाणी: भाटनांगनुर (ता.निपाणी) येथील जवान दीपक गोविंद पाटील (वय ३५) यांचे पुणे येथील सैनिक रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी (दि.९) सकाळी निधन झाले. जम्मू काश्मीर येथील बर्फाळ प्रदेशात सेवेत असताना डिसेंबर २०२४ मध्ये त्यांची तब्येत अचानकपणे खालावल्याने त्यांना जानेवारी महिन्यात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान उपचाराला साथ न मिळाल्याने त्यांचे आज निधन झाले. भाटनांगनुर गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पार्थिवावर रविवारी (दि.१०) सकाळी मूळगावी माळवाडी येथील सार्वजनिक स्मशानभूमीला लागून असलेल्या मोकळ्या जागेत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत, तहसील व पोलीस प्रशासनासह, आजी माजी सैनिक संघटना व ग्रामस्थ त्यांच्याकडून अंत्यसंस्काराची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
शहीद दिपक पाटील यांचे प्राथमिक शिक्षण मुळगावी भाटनांगनुर येथे तर माध्यमिक शिक्षण सिद्धेश्वर विद्यालय कुर्ली येथे झाले होते. त्यानंतर ते दि.१ मे २०१० साली ११५ महार बटालियनमध्ये सैनिक सेवेमध्ये रुजू झाले होते. सध्या ते नायक पदावर कार्यरत होते.
दरम्यान डिसेंबर २०२४ मध्ये ते जम्मू-काश्मीर येथे बर्फाळ प्रदेशात सेवेत असताना त्यांची तब्येत अचानक खालावली. त्यांच्यावर प्राथमिक उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी पुणे येथील सैनिक रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान गेल्या आठ महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. यात उपचाराला साथ न मिळाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दिपक पाटील यांचे पार्थिव गावात दाखल झाल्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. ते अत्यंत मनमिळावू व हळव्या स्वभावाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील, भाऊ, चुलते असा परिवार आहे.
भाटनांगनुर या गावातील आतापर्यंत ७१ जणांनी सैनिकी सेवा बजावली असून सद्यस्थितीत ३४ जण विविध ठिकाणी देशसेवेत कार्यरत आहेत. दीपक पाटील हे पहिले जवान शहीद झाल्याने या गावात शोककळा पसरली आहे.