Belgaum News | शहापुरात हनीट्रॅप; चौघांना अटक

युवतीचा समावेश, एकजण फरार
Belgaum News
बेळगाव : संशयितांकडून पोलिसांनी रक्कम, तीन दुचाकी व मोबाईल जप्त केला. समवेत शहापूरचे निरीक्षक सीमानी, उपनिरीक्षक चौगला, नागराज ओसाप्पगोळ व सहकारी.Pudhari
Published on
Updated on

बेळगाव : आईची घरमालकीण असलेल्या तरुणीला तिच्या आजारपणात खांद्याला धरून उठवत असतानाचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन १५ लाख उकळल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यात त्या तरुणीचाही समावेश आहे. आधी मैत्री आणि नंतर धमकी असे हे प्रकरण असून, त्यामुळे पोलिसांनी हनीट्रॅपचा गुन्हा दाखल केला आहे. शहापुरात हा प्रकार घडला असून, पोलिसांनी संशयितांकडून १० लाख रुपयांसह अन्य मुद्देमाल जप्त केला आहे.

दहा लाखांसह तीन दुचाकी जप्त

Summary

अटक केलेल्या संशयितांकडून १० लाखांची रोकड, तीन दुचाकी व एक मोबाईल, असा १३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या सर्वांवर भारतीय न्याय संहिता- २०२३ कलम १८९ (२), १९२, १४० (२), ११५ (२), ३०८ (२), ३५१(२) व सहकलम १९० अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

विनायक सुरेश कुरडेकर (रा. मंगळवार पेठ, टिळकवाडी) असे तक्रारदाराचे नाव आहे. दिव्या सपकाळे (वय २३, रा. बसवाण गल्ली, शहापूर), प्रशांत ऊर्फ स्पर्ष कल्लाप्पा कोलकार (२५, रा. गाडेमार्ग शहापूर), कुमार ऊर्फ डॉली अर्जुन गोकरक्कनवर (२९, रा. ज्योतिर्लिंग गल्ली, चौथा क्रॉस, कणबर्गी) व राजू सिद्राय जडगी (२९, रा. वाल्मिकीनगर, कणवर्गी) व मारुती अशा पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यापैकी मारुती हा फरारी असून, दिव्यासह चौघांना अटक झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी: विनायकने आपल्या आईला दिव्याच्या घरी भाडोत्री ठेवले आहे. विनायक आईला पाहण्यासाठी अधूनमधून त्या भाडोत्री घरात जात होते. काही दिवसांपूर्वी दिव्या घरी झोपली होती. ती आजारी असल्याचे आईने सांगितल्याने विनायक तिला बघण्यासाठी तिच्या खोलीत गेला. यावेळी दिव्याने त्याच्याशी बोलणे सुरू केले. काही वेळाने विनायकने दिव्याच्या खांद्याला धरून तिला उठवून बसवले. मात्र त्याचा व्हिडिओ बनवण्यात आला. त्यानंतर त्या व्हिडिओच्या आधारे विनायककडून रक्कम उकळण्यात आली.

१५ लाख उकळले, दहाची मागणी दिव्या व प्रशांत यांनी हा सापळा रचला. प्रशांतने त्याच्या अन्य तिघा मित्रांनाही सामावून घेतले. व्हिडिओचा आधार घेऊन त्यांनी विनायकला २५ लाखांसाठी ब्लॅकमेलिंग सुरू झाले. घाबरून विनायकने आधी ५ लाख रूपये दिले. इतकी रक्कम मिळताच संशयितांनी पुन्हा त्याच्याकडे रक्कमेसाठी तगादा लावला. यानंतर विनायकने १० लाख रूपये दिले. यानंतर पुन्हा १० लाखाची मागणी सुरू झाली. यापैकी ७ लाख देण्याची कबुली विनायककडून घेतली.

पोलिसांकडून तातडीने तपास सात लाख दिल्यानंतरही आपल्याला ब्लॅकमेल करणार नाहीत, याची शाश्वती विनायकला नव्हती. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी त्यांनी शहापूर पोलीस ठाणे गाठून याबाबतची फिर्याद दिली. शहापूरचे निरीक्षक एस. एस. सीमानी यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्वन्यांग, डीसीपी रोहन जगदीश यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. सर्व तपशील घेऊन मंगळवारी रात्री उशिरा यासंबंधीची फिर्याद दाखल करून घेण्यात आली. बुधवारी सकाळी या प्रकरणातील तरुणीसह अन्य तिघा संशयितांना अटक करण्यात आली. सर्वांवर हनीट्रॅप व अपहरणाचा गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर उभे केले असता त्यांची कारागृहात रवानगी केली. मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सीमानी, उपनिरीक्षक बी. ए. चौगला, आर. आय. सनदी, नागराज ओसाप्पगोळ, शिवशंकर गुडदैगोळ, श्रीधर तळवार, जगदीश हादीमनी, संदीप बागडी, सिद्धरामेश्वर मुगळखोड, विजय कमते महिला पोलीस श्रीमती कावेरी कांबळे, कु. प्रतिभा कांबळे यांनी ही कारवाई केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news